कोल्हापूर जिल्हा परिषद : महाविकास आघाडीत धुसफूस

Kolhapur Zilla Parishad- Mahavikas Aghadi

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ताबदलानंतर समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामाच्या याद्या बदलाची चर्चा जोरात झाली. ही चर्चा अजूनही थांबलेली नाही, तोपर्यंत अन्य समित्यांच्या याद्यांमध्येही बदलाची मोहीम कारभाऱ्यांनी हाती घेतली आहे. हे करत असताना कारभारी अन्य पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेत नसल्याच्या कारणावरून सत्ताधारी महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेतील सत्ताबदल झाल्यानंतर नवीन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने पहिला बदल केला तो समाजकल्याण विभागात. शासनाने दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ३० कोटींचा निधी दिला होता. या निधीचे वाटप जिल्हा परिषद भाजपची सत्ता असताना करण्यात आले होते. कामाच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या; परंतु त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली नव्हती. या तांत्रिक बाबीचा फायदा उठवत जिल्हा परिषदेत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या कारभाऱ्यांनी भाजपच्या काळात तयार करण्यात आलेल्या यादीला स्थगिती दिली आणि नव्याने या निधीचे वाटप करण्यात आले.

समाजकल्याण विभागाप्रमाणे जलसंधारण, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन समितीच्यावतीने वैयक्तिक लाभासह विविध योजना राबविल्या जातात. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी स्प्रेपंप, ताडपत्री, इलेक्ट्रिक मोटर, कडबाकुट्टी, पीवीसी पाईप, पॉवर विडर आदी वस्तू अनुदान स्वरूपात दिल्या जातात. चालू आर्थिक वर्षासाठी त्याकरिता याद्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवल्या आहेत. त्यात बदल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. यातही राजकारण सुरू असल्याचा आरोप होत आहे. नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरू झाले आहे.

मुस्लिम आरक्षणावरून महाआघाडीत विसंवाद असल्याचे उघड