
रत्नागिरी : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग (Kolhapur-Vaibhavwadi railway ) यावर्षीही रखडण्याची शक्यता आहे. यासह हातकणंगले-इचलकरंजी या रेल्वेमार्गासाठी यंदाही एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर-उस्मानाबाद- तुळजापूर या मार्गासाठी २० कोटींचा, तर अहमदनगर- बीड-परळी वैजनाथ या मार्गासाठी ३७७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे-मिरज-लोंढा या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ५३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला १ लाख १० हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. यानंतर रेल्वेने ‘पिंक-बुक’ प्रसिद्ध केले. कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला भरीव निधीची तरतूद होईल, अशी शक्यता होती. मात्र, या मार्गासह कराड-चिपळूण, बारामती- लोणंद, हातकणंगले- इचलकरंजी, पुणे-नाशिक या मार्गांसाठी प्रत्येकी १ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला २०१६-१७ साली मंजुरी दिली आहे. मात्र, या मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. या मार्गासाठी यावर्षीही निधी मिळाला नसल्याने कोल्हापूरकरांच्या पदरी निराशाच आली आहे. मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केले असले तरी या कामासाठी ५५ महिन्यांच्या कालावधी लागणार आहे. यामुळे पुढील वर्षी (२०२२) मध्ये हे काम सुरू झाले, तरी काम पूर्ण होण्यास २०२७ साल उजाडण्याचीही शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला