कोल्हापूर : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्वीकारला पदभार

Shailesh Balkwade

कोल्हापूर : पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्याने या पदी नेमणूक झालेल्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (Shailesh Balkwade) यांनी आज  कार्यभार स्वीकारला. बोलण्यापेक्षा कारवाई करण्यावर मी जास्त विश्वास ठेवतो. कोल्हापूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आपले कर्तव्य पणास लावू, असा विश्वास नवे अधीक्षक बलकवडे यांनी यावेळी व्यक्त केला.

बलकवडे म्हणाले, समाजाला चांगले पोलिसिंग देण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील. अवैध धंदे, गुंडगिरीचा बीमोड केला जाईल. लोकांसाठी पोलीस यंत्रणा आहे, त्यासाठी ही यंत्रणा अहोरात्र काम करणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पदभार मी डॉ. देशमुख यांच्याकडूनच स्वीकारला होता. तसेच कोल्हापूरचाही त्यांच्याकडूनच स्वीकारत आहे. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगले काम केले आहे.

त्याच प्रकारे यापुढेही काम चालेल. कोल्हापूरकरांच्या तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व्यवस्थित आणि कमी वेळेत सोडविण्याचा प्रयत्न करू. पोलीस खात्यातील तांत्रिक कामकाजामध्ये आणखी सुधारणा केली जाईल. लोकांचा विश्वास पोलीस यंत्रणेवर राहिला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न राहील, असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER