कोल्हापूरला महापुराचा धोका कायम : राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडले

Kolhapur Dam

कोल्हापूर : शहर परिसरात पावसाने उसंत दिली असली तरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने गुरुवारी सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडली. तर राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्गालगत सांगली फाटा येथे पुराचे पाणी आले. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर केर्ले फाटा येथे पाणी आल्याने रत्नागिरी कडे जाणारा मार्ग बंद झाला.

कोल्हापूर गगनबावडा मार्गे कोकणात जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने तोही मार्ग गेल्या दोन दिवसापासून बंद आहे. शहरातील जयंती नाल्यातील पाण्याचा फुगवटा येऊ लागल्याने शहरातील 70 कुटुंबांचे स्थलांतर केले. शिरोळ तालुक्यातील दहा गावांसह करवीर तालुक्यातील आंबेवाडी, चिखली आणि वडणगे येथील पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे प्रशासनाने स्थलांतर केले. गेल्या 24 तासात सरासरी 18 फुट पाणीपातळी वाढल्याने कोल्हापूरकर भीतीच्या छायेखाली आहेत. काळमवाडी धरण 80 टक्के भरले आहे.

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होणार आहे. मागील वर्षी आलेल्या महापुराने 55 फूट इतकी पाणी पातळी गाठली होती. गुरुवारी सायंकाळी दहा वाजेपर्यंत पंचगंगा 44 फुटांवरून होत होती. शहरातील शिवाजी पूल येथे कमनीला पाणी लागले की मच्छिंद्री झाली म्हणतात. मच्छिंद्र झाली म्हणजे कोल्हापूर शहरात महापूर आला असे मानले जाते. यापुढे शहरात पाणी शिरण्यास सुरुवात होणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पूरबाधित क्षेत्रासह नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER