चंद्रकांत पाटलांना सर्वात मोठा धक्का, पाटलांच्या गावातील सत्ता शिवसेनेने हिसकावली

Chandrakant Patil

कोल्हापूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलयांना (Chandrakant Patil) शिवसेनेने जबर धक्का दिला आहे. चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव खानापूर येथे शिवसेनेने आपला झेंडा फडकावला. खानापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी खानापूरमध्ये विजय खेचून आणला आहे.

शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावातील खानापूर गावात सत्तांतर घडवलं आहे. खानापूरमधील शिवसेनेचा विजय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, शिवसेनेचा वारु रोखण्यासाठी भाजपने चक्क ‘हाता’वर ‘घड्याळ’ बांधले होते. या प्रकाराची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली होती. भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे स्थानिक नेते एकत्र आले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खानापूरमधील प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. सत्ता खेचून आणण्यासाठी आबिटकरांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी रंगतदार निवडणूक पाहायला मिळणार होती. मात्र, प्रकाश आबिटकरांनी खानापूरमध्ये विजय मिळवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठं बक्षीस दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER