कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरू

Kolhapur-Ratnagiri route start

कोल्हापूर :- पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेले होते. कोल्हापुर- रत्नागिरी या मार्गावरही पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे हा मार्गही एक आठवडा बंद होता. मंगळवारी या मार्गावरील पाणी कमी झाल्याने हा मार्ग आजपासून सुरू करण्यात आला आहे.

पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी मार्ग पाण्याखाली गेला होता. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलापासून ते रेडेडोह प्रयाग चिखली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे हा भाग पूर्णपणे जलमय झाला होता. कोल्हापूर रत्नागिरी हा मार्ग कोकणाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. गेल्या दहा दिवसापासून हा रस्ता बंद असल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काल, सोमवार संध्याकालपर्यंतया रस्त्यावर पाणी होते. मात्र आज सकाळी या रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक सुरू करण्यात आली. या मार्गावर सर्वच वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. या मार्गावरील रेडेडोह या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला प्रयाग चिखली या गावातील पुरात मृत पावलेल्या जनावरांचा खच लागला आहे. या ठिकाणी पाणी असल्याने ही जनावरे प्रशासनाकडून हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. तर प्रयाग चिखली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाही काही मृत जनावरे पडली आहेत. काही मृत जनावरे उसाच्या शेतामध्ये पडली आहेत. ही जनावरे प्रशासनाने अद्याप हटवली नाहीत. त्यामुळे वाहनधारकांनी काळजी घ्यावी.