कोल्हापूर ; पावसाचा जोर ओसरला : 60 बंधारे अद्याप पाण्याखालीच

Kolhapur Rain

कोल्हापूर : गेले दोन दिवस पावसाचा (Kolhapur Rain) जोर कमी झाल्याने तुर्तास पुराचा धोका टळला आहे. राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) सर्व स्वयंचलित दरवाजे रविवारी बंद झाले. धरणातील विद्युत विमोचकातून १४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अद्याप सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या २४ तासांत सरासरी दोन फुटांनी कमी झाली असून ४२ फुटांवर स्थिरावली आहे. कसबा बावडा-शिये, आदींसह प्रमुख मार्गांवर आलेले पाणी कायम असून अद्याप 60 बंधारे पाण्याखाली आहेत.

दोन दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगा नदीने ४४ फुटांची धोक्याची पातळी गाठली होती. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नदी काठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला होता. कोल्हापूर रत्नागिरी, कसबा बावडा-शिये आदींसह करवीर आणि शिरोळ तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. पावसाने उघडीप दिल्याने शनिवारी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाले. तर रविवारी उर्वरित दोन दरवाजे बंद झाले. गेल्या काही दिवसांत फुटाने वाढलेली पंचगंगा नदीची पाणी पातळी इंच-इंच अशा संथ गतीने कमी होत आहे. दरम्यान, कोल्हापूर शहारात कदमवाडी-भोसलेवाडी, बापट कॅम्प परिसर, शाहूपुरी कुंभार गल्ली, पंचगंगा तालीम परिसर, फोर्ड कॉर्नरच्या मागील जयंती नाल्याची बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. पावसाच्या उघडीपीनंतर रविवारी ते कमी झाले होते. पंचगंगा नदी घाट परिसरातील पाणी जामदार क्लबपर्यंत कमी झाले होते.

पंचगंगेची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. रविवारी दुपारी एक वाजता पंचगंगेची पातळी धोका पातळी खाली आली. दुपारी बारा वाजता ४३ फुट १ इंचावर असलेली पाणी पातळी एक वाजता ४२ फूट ११ इंचापर्यंत खाली आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणीपातळी ४२.७ फुटांवर आली. पाणी पातळी कमी होत असल्याने कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील पाणी ओसरू लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER