कोल्हापूरच्या राजकारणाची गोकुळच्या निमित्ताने होणार खिचडी

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्यातील वादच केंद्रस्थानी आहे. जिल्हा बँक आणि गोकुळ दोन्ही बिनविरोध करण्याच्या पडद्यामागील हालचाली असल्या तरी सतेज पाटील आणि महाडिक यांच्या राजकीय दंगलीत जिल्ह्याच्या राजकारणाची दोन गटात विभागणी होताना दिसत आहे. गोकुळच्या मलईसाठी कोल्हापूरच्या राजकारणाची अक्षरश: खिचडी होईल. पालकमंत्री पाटील आणि महाडिक वादात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबत येणाऱ्या पाठीराख्यांची भूमीका महत्वाची ठरणार आहे. दोघांना पाठिंबा देणारी ही तिसरी व्यक्ती जितकी ताकदवान तो गटच गोकुळचे सत्तासोपान गाठेल.

महाविकास आघाडीच्या निमित्ताने जिल्ह्यात भाजप विरुध्द काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष अशी राजकाणाची वरवर पक्षीय विभागणी झाली आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटणारे नेते आता गोकुळ आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसतील. गोकुळच्या निमित्ताने होणारी आघाडी किती दिवस टिकणार त्यावरच त्यांचे स्वतःचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने अनेकजण सावध आहेत. तालुकावार आघाडीच्या निमित्ताने तयार झालेली राजकीय समीकरणे पुढच्या विधानसभेच्या गणितामुळे गोकुळ निवडणुकीत पुन्हा घडणार की बिघडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना जिल्हापरिषदेत सत्तेपर्यंत पोहचले. आता हीच एकी जिल्हा बँक आणि गोकुळच्या निवडणुकीत टिकणार काय? हा खरा सवाल आहे. शिवसेनेला अजूनही अंतर्गत दुहीने ग्रासले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षातील नेते राजकीय व्यासपीठावर एकत्र असले तरी कार्यकर्त्यांत अजून सौख्य नाही. राज्यातील सत्ता जाताच भाजपतील पक्षप्रवेशाचा धुमधडाका थांबला आहे. राज्यात आघाडीची सत्ता किती काळ टिकणार याबाबत संदिग्धता असल्याने काटावरचे नेते वेटींगवर आहेत. महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे प्रत्येक तालुक्यात राजकीय त्रिकोण अस्तित्वात येत आहेत.

जनुसराज्य पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे आणि महादेवराव महडिक हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी गोकुळच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यानंतर गोकुळमध्ये महाडिकांच्या सोबत असलेले शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील शाहूवाडी पन्हाळ्यातील राजकारणासाठी कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. करवीरमध्ये आ. पी. एन.पाटील आणि चंद्रदीप नरके या दोन गटातच निवडणुका होत असल्याने पी. एन. यांच्या निर्णयावरच नरके यांची गोकुळची भूमिका ठरेल. गोकुळच्या व्यासपीठावर पी. एन. पाटील यांची महाडिक यांना भक्कम साथ आहे. महादेवराव महाडिक यांच्या भाजपच्या भूमीकेबाबत संचालक मंडळात दोन गट आहेत. मात्र, महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, अशी पुष्ठी जोडली जात आहे. कागल तालुक्यात ‘आमचं ठरलयं’चा नारा देत मंत्री हसन मुश्रीफ आणि खा. संजय मंडलिक एकत्र आले. आतापर्यंत गोकुळमध्ये विरोधी आघाडीला साथ देणारा संजय घाटगे गट बदलेल्या घडामोडीत कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. घाटगे यांचे व्याही जिल्हापरिषद सदस्य अरुण इंगवले यांनी यापूर्वीच भाजपसोबत घरोबा केला आहे. विरोधात निवडून येवूनही संचालक अमरिशसिंह घाटगे यांनी सत्ताधाऱ्याशी आतापर्यंत जुळवून घेतले आहे. घाटगे सत्ताधारी गटातून उमेदवारी दाखल करणार की सवता सुभा मांडणार हे अध्याप निश्चित नाही. मुळचे राष्ट्रवादीचे मात्र आता शिवबंधनात अडकलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची अजून जिल्ह्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केलेली नाही. गोकुळबाबतच्या त्यांच्या भूमीकेचा परिणाम शिरोळ तालुक्यातील राजकारणावर होणार आहे.

राधानगरी-भुदरगड-आजरा तालुक्यात आ. प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील, ए. वाय. पाटील गट गोकुळच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार काय? मागील वर्षी के. पी. पाटील यांनी स्वतंत्रपणे ठराव दाखल केले होते.

हातकणंगलेत महाडिक विरोधात आ. राजूबाबा आवळे आणि शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर अशी आघाडीची शक्यता आहे. माजी खा. निवेदिता माने यांनी जिल्हाबँकेत एका सत्कार समारंभात मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या भूमिकेला जाहीर पाठींबा दिला आहे. राजू शेट्टी यांची वाटचाल भाजपविरोधात असल्याने लोकसभेचे प्रतिस्पर्धी शेट्टी आणि खा. धैर्यशील माने गोकुळच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसल्यास आर्श्चय वाटणार नाही. जिल्ह्यातील राजकीय अभिनिवेष बसणात गेल्याने कधी नव्हे इतकी जिल्ह्याच्या राजकारणाची सरमिसळ गोकुळच्या निमित्ताने दिसून येईल.

मंत्री हसन मुश्रीफ यांना गोकुळपेक्षा जिल्हा बॅंकेची एकहाती सत्ता महत्वाची आहे. त्यासाठी पी.एन. पाटील , महादेवराव महाडिक आणि पर्यायाने भाजपची मदत लागणार आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यास पालकमंत्री सतेज पाटील यांचे राजकीय महत्व कमालीचे वाढणार आहे. त्यामुळेच मुश्रीफ यांची भूमीका महत्वाची आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक गटाविरोधात राजाराम कारखाना आणि गोकुळच्या निमित्ताने थेट आघाडी उघडली आहे. गोकुळच्या राजकारणात पी. एन. पाटील यांची ताकद सत्ताधारी आघाडी म्हणजेच महाडिक यांच्या बाजूने आहे. गोकुळ निवडणूक केंद्रस्थानी राहूनच जिल्हा बँक निवडणुकीची व्यूह रचना आखली जाईल. पी. एन. पाटील हीच गोकुळच्या सत्ताधारी आघाडीची खरी ताकद आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील आणि महाडिक यांच्या वादात मंत्री मुश्रीफ आणि पी.एन. पाटील यांची ताकदही खऱ्या अर्थाने दिसून येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER