कोल्हापूर : राष्ट्रवादीची पदवीधरसाठी फिल्डिंग

NCP

कोल्हापूर : पक्ष वाढीसाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या तालुका निहाय आढावा बैठकीस मार्गदर्शन करताना केले. पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांचा वापर करून मोठे झाले तेच ऐनवेळी पक्ष सोडुन गेले एका अर्थाने ते बरे झाले. आता प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देता येईल अन्याय होणार नाही. आणि म्हणूनच जे पद घेऊन काम करत नाहीत त्यांची योग्य ती दखल पक्षाने घेतली आहे त्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश कार्यालयास पाठवणार आहे.

सारंग पाटील म्हणाले, बुथ कमिटी सक्षम करा पक्ष तळागाळापर्यंत सक्षम होईल, त्यामुळे येणा-या कोणत्याही निवडणुकीत एकीने लढवुया यश निश्चित असेल नाही तर गत पदवीधर निवडणुकीत आपल्याच लोकांनी बंडखोरी केल्यामुळे चंद्रकांत दादा पाटील निवडुन आले होते. याचा विचार करून पक्ष कोणालाही उमेदवारी मिळु दे पण एकच उमेदवार पक्षाचा असावा म्हणजे विरोधकांचे फावणार नाही याची यावेळी दक्षता घ्यावी लागेल. आणि म्हणूनच कुणालाही उमेदवारी मिळु दे, पण कार्यकर्त्यांनी पदवीधर निवडणुकीच्या तयारीला आता पासुनच कंबर कसली पाहिजे.