कोल्हापूर : आयुक्त सायकलवरून तर महापौर रिक्षातून महापालिकेत

Malinath Kalshetti-Nilofar Arekar

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या ‘नो व्हेईकल डे’ निमित्त आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी सायकलवरुन 25 किमी प्रवास केला. विविध कार्यक्रमांबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीसही ते सायकलवरुन आले. कार्यालयाच्या आवारात त्यांना नागरिकांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तर महापौर निलोफर आरेकर यांनी रिक्षातून प्रवास केला.

सार्वजनिक वाहतुकीचा (केएमटी) जास्तीतजास्त वापर, वाहतूक समस्या आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने ‘नो व्हेईकल डे’ साजरा केला जात आहे. ३१ डिसेंबर २०१९ पासून महिन्याच्या अखेरच्या दिवशी हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाला पदाधिकाऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

स्वत: आयुक्त सकाळी सायकलवरुन महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर अनेक कर्मचारी सायकवरुन अथवा केएमटी बसमधून दाखल झाले. महापौर निलोफर आजरेकर यांनी महापालिकेच्या गाडीचा वापर न करता रिक्षातून प्रवास करत दैनंदिन कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

आयुक्तांनी कार्यालयातील कामकाजाबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, लिशां हॉटेल चौक येथे ज्येष्ठ नागरीकांचा महालक्ष्मी कार्यालयातील कार्यक्रम व महाराष्ट्र हायस्कूल येथे कार्बनमुक्त कोल्हापूर या कार्यक्रमास सायकलवरुन हजेरी लावली. भाजप गटनेते अजित ठाणेकर यांनीही सायकलवरुन महापालिकेत येणे पसंत केले.

कोल्हापुरातील 4 हजार फेरीवाल्यांचे नावे संकेत स्थळावर