
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना या महामारीने घातेलले थैमान आणि सीपीआर या जिल्हा रुग्णालयावर पडलेला ताण विचारात घेवून जिल्हा उपरुग्णालये व तालुका रुग्णालये सक्षम करण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांच्या पाठपुराव्याला यश आले. त्याचाच एक भाग म्हणून गडहिंग्लज येथील शंभर खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात गडहिंग्लज तालुक्यासह परिसरातील अन्य तालुक्यातील रुग्ण उपचार घेत असतात. गंभीर आजाराकरीता येथील रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर व अन्य शहरी ठिकाणी जावे लागते. हे रुग्णालय अद्यावत करणेबाबतची गरज ओळखून खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी व्यक्ती, संस्था, उद्योजक यांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून व उद्योजक विज्ञान मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे इंडोकौंट उद्योग समूह संचलित इंडो काउंट फाउंडेशनतर्फे आपल्या सामाजीक कार्याचा सहभाग म्हणून गडहिंग्लज उप जिल्हारुग्णालयास खास.मंडलिक यांच्या उपस्थितीत दोन व्हेंटिलेटर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे दिले .
खा. मंडलिक यांनी यापुर्वीच या रुग्णालयाकरीता आपल्या स्वनिधीतून एक स्वॅब मशिन दिले असून दोन व्हेंटिलेटर लवकरच देणार आहेत. यावेळी प्रा. मंडलिक म्हणाले, आपण केलेल्या आवाहनास वाढता प्रतिसाद म्हणून अतिदक्षता विभागाचे दहा बेड व अधिकचे दोन व्हेंटीलेटर देणेकरीता देणगीदार पुढे आले असून अशा प्रकारे या रुग्णालयात व्हेंटिलेटरची एकूण संख्या लवकरच सहा होणार आहे. यामुळे शंभर खाटांच्या या हॅास्पिटलचे पुर्णत: अद्यावतीकरण झाल्याने कोल्हापूरला येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होवून गडहिंग्लजसह आजरा व भुदरगड तालुक्यातील गावांना याचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी याठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचेसह इंडोकौट स्पिनींग मिलचे उपाध्यक्ष शैलेश सरनोबत, संचालक कमल मिश्रा यांचेसह चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे, प्रतीक चौगुले वैगेरे, उद्योगपती उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला