महापुरानंतर सावरला कुंभारवाडा

kolhapur flood kolhapur news

कोल्हापूर :- महापुरात कोल्हापुरात कुंभारवाड्यात अनतोनात नुकसान झाले. बापटकॅम्प, कुंभारगल्ली,शुक्रवारपेठ आदी भागातील कुंभार वाड्यात कोट्यावधीचे नुकसान झाले होते. महापुराच्या प्रलयातील नुकसानिचे दु:ख मागे सारत श्री गणरायाच्या आगमनाने कुंभार वाडा परिसर चैतन्यदायी वातावरणाने भारल्याचे चित्र सोमवारी होते. “गणपती बाप्पा मोरया’, “मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी मंगलमयी वातावरणाने महापुराच्या पाऊल खुणा पुसून टाकल्या. रिमझिम पावसाच्या साथीने श्रीगणेशाला भक्तांकडे सूपर्द करताना कुंभार बंधूंचा आनंद द्विगुणित झाल्याचे आशादायी चित्र होते.

महापुराच्या प्रलयात ४ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत महापुराच्या तडाख्यात शहरातील कुंभार बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. कुंभार बंधूंना मोठा आर्थिक फटका बसला. यातूनही कुंभार बांधव पुन्हा उमेदीने सावरले. रात्रंदिवस राबून गणेश मूर्तीं पूर्ण केल्या. काल,रविवारी सकाळपासूनच भक्तांची कुंभार गल्लीत गणेश मूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती.

पापाची तिकटी, महाव्दार रोड परिसरातील बाजारात खरेदीसाठी झुंबड होती. हलवायाच्या दुकानात मोदक आणि लाडूसाठी गर्दी दिसत होती. श्रींची मूर्ती घरी नेण्यासाठी मूर्तिकारांच्या घरी आणि स्टॉल्सवर लगबग होती. गर्दी आणि सळसळता उत्साह, असे वातावरण पापाची तिकटी, गंगावेश परिसर सोमवारी दिवसभर होते. मंडळांची लगबग सुरू असताना घरगुती गणेशमूर्तींसाठीही भक्तांनी गर्दी केली होती. शेकडो छोट्या सुबक गणेशमूर्ती कोणी रिक्षामधून, कोणी कारमधून तर कोणी पायी चालत “गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात घरी नेत होते. शाडूच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. गणरायाची मनोभावे पूजा करण्यासाठी जास्वंद, गुलाब, केवडा, मोगरा, शेवंती, झेंडूची फुले, दुर्वा खरेदी करण्यासाठी बाजार खचाखच भरले होते. पापाची तिकटी परिसरातील दुकानांमध्ये आणि ठिकठिकाणी लावलेल्या स्टॉल्सवर धूप, कापूर, अगरबत्ती, चंदन, मखर, मुकुट, कंठी घेण्यासाठी गर्दी होती.अशा मंगलमयी वातावरणात श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना भक्तांनी केली.

ही बातमी पण वाचा : श्रींच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज