अपेक्षांचे ‘अभिनव’ ओझे

Abhinav Deshmukh

कोल्हापूर : कोल्हापुरातून चालवल्या जाणाऱ्या मटक्याची महिन्याची उलाढाल सुमारे हजार कोटी रुपयांची होती. त्यावरुन या काळ्या धंद्याची ताकद समजते. मटका बंद होणे यंत्रणेचे मोठे आर्थिक नुकसान असे मानले जाते, मटका बंद होवूच नये यासाठी यंत्रणाच काम करत असल्याचा जुना अनुभव आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांनी कोल्हापुरातीलच नव्हे तर मुंबईसह गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातील मटकासम्राटांना अंडरग्राउंड होण्यास भाग पाडले. मोक्का लावत कायद्याचा धाक कायम ठेवला. डॉ. अभिनव देशमुख यांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून कोल्हापूरकरांच्या पोलीसदलाबाबतच्या अपेक्षा वाढविल्या आहेत. कोल्हापूरकरांचे अपेक्षांचे ओझे भविष्यातही पोलीसदलास पेलावे लागणार आहे.

कोल्हापूरच्या इतिहासात २५ वर्षापूर्वी शिवप्रतापसिंह यादव यांच्या काळात आणि त्यानंतर डॉ. मनोजकुमार शर्मा आणि आता डॉ. देशमुख यांच्या कारकिर्दीत असा फक्त तीनच वेळा मटका हद्दपार झाला. चिल्यापिल्यांना मोक्का लावून ‘मोका’साधण्याचा उद्योग अनेकांनी केल्याची उदाहरणं आहेत. कायद्याचा धाक कायम ठेवत, डॉ. देशमुख यांनी कोल्हापूर पोलीस दलास वेगळ्या उंचीवर नेले. यापूर्वी त्यांनी गडचिरोलीत नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले होते.

संयमाने परिस्थिती हाताळत नक्षलप्रभावी गावेच्या गावे मु्ख्य प्रवाहात आणली. आपल्या वर्दीप्रती, कर्तव्याप्रती, आपला अधिकार आणि सामाजिक सुरक्षेप्रती पोलीस अधिकाऱ्यांनी कसे असावे, याचे सातारा, गडचिरोली अन्‌ कोल्हापुरातील कामातून दाखवून दिले. एक प्रामाणिक अधिकारी शांतपणे काय करु शकतो? याचा वस्तूपाठ म्हणून डॉ. देशमुख यांच्या कारकिर्दीकडे पहावे लागेल. डॉ. देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर भेटायला येणाऱ्याची गर्दी आणि बाहेर पडल्यानंतर काम झाल्याचा सर्वसामान्यांच्या चेहरावर दिसणारा आनंद ही डॉ. देशमुख यांच्या कामाची पोहोच पावती होती. मागील वर्षीच्या महाप्रयलकारी महापुरात डॉ. देशमुख यांनी प्रयत्न नियोजन करत कोल्हापूर शहर, करवीर आणि शिरोळ तालुक्यातील अनेकांचे जीव तर वाचवलेच परंतू पशूधन वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले. कोरोना महामारीत त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने बजावलेल्या सेवेला तोड नाही.

फेसबुकवर जाहीरपणे हा माझा मोबाईल क्रमांक असून त्यावर बिनदिक्कीत तक्रार करा, योग्य तक्रारीचे निराकरण केले जाईल असे जाहीरपणे सांगणारे डॉ. देशमुख यांच्यासारखे दुर्मिळच अधिकारी असतील. मटकाकिंग, सावकार तर हादरलेच फाळकुट दादाही गायब झाले. गुंडगिरीला कायद्याची जरब बसली. रस्त्यात थुंकला आणि हुज्जत घातली याकारणास्तव पिडीत महिलेने केलेल्या मेसेजवजा तक्रारीनंतर संबंधितावर गुन्हा दाखल झाला. डॉ. देशमुख यांच्या कार्यकुशलतेची कोल्हापुरातील अशी शेकडो उदाहरणे देता येतील. वाहतुकीच्या कोंडीपासून पोलीस ठाण्यातील विलंबाबत कसल्याही वैयक्तिक व सामाजिक तक्रारीची दखल पोलीसांकडून घेतली जाते, हा विश्वास कोल्हापूरकरांत निर्माण करण्यात डॉ. देशमुख कमालीचे यशस्वी झाले. कोल्हापूरकरांना आश्वासक वाटणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी खूप छोटी आहे. यायादीत डॉ. देशमुख यांचे नाव आता कायमचे जोडले गेले आहे.

संतोष पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER