कोल्हापूरच्या या गड्यानं बनवलेला चित्रपट इतका गाजला की इंग्रजांनी मनोरंजन कर लावून कमावले प्रचंड पैसे!

Baburao Painter

भारतीय चित्रपट व्यवसाय आज हजारो कोटींची उलाढाल करतोय; पण याची सुरुवात मोठी खडतर होती. अनेकांनी आपली आयुष्ये सिनेमा बनवण्याची कला शिकायला, सिनेमे बनवणूक गर्दी थिएटरमध्ये खेचायला दिली. म्हणून आज भारतीय सिनेसृष्टी हॉलिवूडशी स्पर्धा करते आहे. भारतीय चित्रपट व्यवसायाला मोठ्या उंचीवर ठेवण्यात अशीच अथक मेहनत घेतली होती. ‘बाबुराव पेंटर’ (Baburao Painter) नावाच्या ध्येयवेड्या माणसानं. कोल्हापुरात (Kolhapur) १८९० ला बाबुराव पेंटर ऊर्फ ‘बाबुराव कृष्णराव मिस्त्री’ यांचा जन्म झाला. सिनेमांचं शूटिंग करताना रात्रीच्या वेळी चित्रीकरण शक्य व्हायचं नाही. यामुळं मोठा पैसा आणि श्रम खर्च व्हायचे.

बाबुरावांना यावर उपाय काढायचा होता. ही गोष्ट बाबुरावांनी जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितली तेव्हा अनेकांनी त्यांची चेष्टा केली; पण बाबुराव निश्चयी होते. ते त्यांच्या विचारावर ठाम राहिले. लोक ज्या गोष्टीला असंभव मानत होते तिला बाबुरावांनी शक्य करून दाखवलं. ही गोष्ट आहे १९२३ ची. चित्रीकरणासाठी लागणारी आधुनिक सामग्री भारतात तोपर्यंत पोहचली नव्हती. बाबुराव ‘सिंहगड’ नावाच्या मराठी चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्या वेळी त्यांना रात्री एका दृश्याचे चित्रीकरण करावे लागणार होते. अशा वेळी त्यांनी शक्कल लढवली आणि तो सीन आतषबाजीची दारू उडवून त्या प्रकाशात चित्रीकरण केलं. पुढच्याच वर्षी त्यांना या सीनबद्दल लंडनच्या वेम्बले महोत्सवात सन्मानित करण्यात आलं. आजच्या काळात लाइट्स अगदी सहज उपलब्ध होतात.

पण आजपासून १०० वर्षांपूर्वी परिस्थिती गंभीर होती. त्यांनी आतषबाजीसाठी वापरलेल्या दारूचा वापर करून प्रकाश निर्माण केला आणि त्यामुळं रात्रीच्या वेळी चित्रीकरणासाठी येणारा अडसर दूर झाला. यानंतर अनेकदा बाबुराव पेंटर यांनी चित्रीकरणावेळी येणाऱ्या शेकडो अडचणींवर मात केली. बाबुरावांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल अनेकांना जाणीव नाही. त्यांच्याबद्दल बोललं जात नाही; पण त्यांना नाव कमवण्याची हौस नव्हती. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळकेंच्या तोडीस तोड सिनेमे बनवण्यात ते व्यस्त होते. चुलतभाऊ आनंद पेंटर याच्यासोबत मिळून बाबुरावांनी पेंटर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी नाट्यगृहाच्या रंगरंगोटीत मोठी कामगिरी बजावली. त्यांनी काढलेल्या चित्रांमुळं नाटकं जिवंत व्हायची.

हे करत असतानाच त्यांची ओळख अभिनयाशी, नाट्यक्षेत्राच्या अद्भुत दुनियेशी झाली. त्यांची आवड त्यांना मूक चित्रपटांकडे घेऊन गेली. ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट बघितल्यानंतर बाबुराव यांच्या मनात चित्रपटनिर्मितीबद्दल कुतूहल निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यांनी चित्रपट पाहण्याचा सपाटा लावला. कॅमेरा असतो कसा? तो काम कसा करतो? चित्रीकरणासाठी काय करावं लागतं? बाबुरावांच्या मनात असंख्य प्रश्न होते. दादासाहेब फाळकेंकडे या प्रश्नांची उत्तरं होती. बाबुरावांनी फाळकेंना गाठलं; पण त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही. बाबुराव खचले नाही तर त्यांनी स्वतःचा कॅमेरा बनवण्याचा निर्णय घेतला. एका जुन्या प्रोजेक्टरचा वापर करून कॅमेरा बनवण्याचा निर्णय घेतला. १९१८ ला त्यांनी चुलतभाऊ आनंदराव आणि शिष्य व्ही. जी. दामले यांच्या सहकार्यानं स्वतःचा कॅमेरा बनवला. १९१९ला कोल्हापुरात त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ या नावानं स्वतःची कंपनी सुरू केली. ज्यात व्ही. शांतारामांसारखे सिनेक्षेत्रातले दिग्गज सहभागी होते. काही सदस्य प्रभात कंपनीत गेल्यामुळं त्यांना ही कंपनी बंद करावी लागली.

यानंतर त्यांनी स्वतःच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. हा सिनेमा प्राचीन महाभारतातील कथेवर होता. सिनेमाचं नाव होतं- ‘सौरंध्री’. सिमेमाची कथा केचक आणि सौरंध्री भोवती फिरते आणि याच सिनेमावर ब्रिटिशांनी सेन्सरशिपची कात्री चालवली. भारतीय चित्रपटांच्या प्रवासातली ही पहिलीच घटना होती. झालं असं की, यात भीम केचकला मारतानाचं दृश्य चित्रित करण्यात आलं. हे दृश्य इतकं भयानक होतं की, हा चित्रपट पाहणाऱ्या महिलांनी थिएटरमध्ये आरडाओरडा सुरू केला. यानंतर हे दृश्य सिनेमातून हटवण्यात आले. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. बाबुराव यातून प्रेरित झाले. त्यांनी यानंतर १८ आणखी मूक चित्रपट आणि ९ सिनेमे बनवले. ज्यावेळी भारतीय चित्रपट पुराण कथा आणि मिथकांवर अवलंबलेले असायचे. त्यावेळी बाबुरावांनी सामाजिक विषय चित्रपटांच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवण्याचं कार्य केलं. सावकार शेतकऱ्यांची करत असलेली पिळवणूक, जनतेची दुर्दशा यावर त्यांनी थिएटरच्या काळोख्या अंधारत प्रकाश टाकला. त्यांना जनतेचं भरभरून प्रेम मिळालं.

यांच्यामुळे सिनेमावर लागतोय सरकारी कर नंतर बाबुराव पेंटरांनी ‘सिंहगड’ हा सिनेमा बनवला. तो प्रदर्शित झाला. सिनेमा पाहायला तोबा गर्दी उसळली. त्यावेळी सिंहगड हा सिनेमा पाहण्यासाठी लोक अगदी वेडे झाले होते. ब्रिटिशांच्या ही गोष्ट ध्यानात आली आणि त्यांनी पहिल्यांदा भारतात एखाद्या सिनेमावर राजस्व कर लादला. ही बाबुरावांची किमया होती. बाबुरावांनी चित्रपट फक्त बनवले नाहीत तर चित्रपटसृष्टीचा पाया भारतात मजबूत केला. त्यांच्या योगदानामुळं आज भारतीय सिनेसृष्टी डौलात उभी आहे. अशा या महान अवलियानं १९५४ ला जगाचा निरोप घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER