अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (शनिवारी) करवीरनिवासिनी अंबाबाईची (Kolhapur Ambabai)  महिषासुरमर्दिनी (Mahishasurmardini) रूपात पूजा बांधण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. कोल्हापूरची अंबाबाई ही असुरांचा संहार करणारी आणि प्रजेचे रक्षण करणारी देवता आहे. आदिशक्ती आणि दुर्गेचे एक रूप असलेल्या या देवीचा सकाळी शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महिषासुरमर्दिनी रूपात तिची पूजा बांधण्यात आली. अष्टमीला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्यासाठी अत्यंत क्रोधाने भगवान शंकराने आपल्या शरीरातून भद्रकाली, महाघोर रुद्रगण, कोटियोगिनी, असे महाशक्तिगण निर्माण केले. यामुळे अष्टमीची पूजा, उपवास, जागर आणि चंडी होमाला विशेष महत्त्व आहे.

महिषासुराच्या अत्याचारांच्या व्यथा घेऊन सर्व देव शंकर व विष्णूकडे गेले. या दैवतांच्या तेजातून निर्माण झालेल्या दुर्गेने घनघोर युद्ध सुरू केले. आपल्या मायावी शक्तीने महिषासुराने अनेक रूपे घेतली. अखेर महिषाचे (रेड्याचे) रूप धारण केलेल्या या दैत्याचा देवीने वध केला; म्हणून अष्टमीला अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधली जाते. ५१ शक्तीपीठांच्या यादीत करवीरसाठी येणारा ‘करवीरे महिषमर्दिनी’ असा उल्लेख आहे. ही पूजा, श्रीपूजक प्रसाद लाटकर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER