भारत विजयी: टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीचा विक्रम; हिटमॅन रोहितला टाकले मागे

Virat Kohli

मोहाली :- भारत-दक्षिण आफ्रिका दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने आफ्रिकेवर दमदार विजय नोंदविला आहे. दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात या विजयासह तीन लढतींच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात विराटने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात आपला सहकारी रोहित शर्माला मागे टाकले आहे. नाबाद ७२ धावांची खेळी करत विराटने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याचसोबत विराट टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आपला सहकारी रोहित शर्माला दुसऱ्या स्थानी ढकलले आहे.

ही बातमी पण वाचा : बॉक्सिंगमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे यश निश्चित

रोहितचा विक्रम मोडण्यासाठी विराटला आजच्या सामन्यात अर्धशतकी खेळीची गरज होती. त्यातच रोहित शर्मा अवघ्या १२ धावा काढून माघारी परतल्यामुळे विराटला रोहितचा विक्रम मोडण्याची संधीच मिळाली.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज

विराट कोहली – २४४१ धावा
रोहित शर्मा – २४३४ धावा
मार्टीन गप्टील – २२८३ धावा
शोएब मलिक – २२६३ धावा
बँडन मॅक्युलम – २१४० धावा

दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात केली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मोहालीच्या मैदानावरील या विजयामुळे भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विराटने या सामन्यात नाबाद ७२ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दक्षिण आफ्रिकेकडून १५० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने विजयी लक्ष्याच्या दिशेने यशस्वी आगेकूच केली.

शिखर धवन ४० धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ऋषभ पंतही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरला साथीला घेत आपले अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेकडून फेलुक्वायो, शम्सी आणि फॉर्च्युन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

तिसऱ्या सामन्यात भारताने विजय नोंदविल्यास मालिका भारताच्या खिशात पडणार आहे.

ही बातमी पण वाचा : विराट हा ‘वन अँड ओन्ली’