कोहली म्हणतो, कोरोनाच्या काळात क्रिकेटची कमतरता जाणवलीच नाही

Virat Kohli

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अतिशय व्यस्त राहणाऱ्या विराट कोहलीसारख्या (Virat Kohli) आघाडीच्या खेळाडूने एक धक्कादायक विधान केले आहे. तो म्हणतो की, कोरोनाच्या (Corona) खंडामुळे जेवढे वाटत होते तेवढी खेळाची कमी काही जाणवली नाही. कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून विराटचे खेळणे बंद पडले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने हे विधान केले आहे.आयपीएलसाठी (IPL) काही दिवसांपूर्वीच त्याने पुन्हा सराव सुरू केला आहे. तो म्हणतो की, कोरोना नसता तर एवढे दिवस असा निवांतपणा मिळालाच नसता.

म्हणून हा खंड एका परीने चांगलाच म्हणायला हवा. २०१७ पासून कोहली दरवर्षी सरासरी ४० आंतरराष्ट्रीय सामने खेळत आला आहे आणि यंदा मार्चपर्यंतच तो १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला होता. यात आयपीएलच्या सामन्यांचा समावेश नाही. तो केला तर ही सरासरी आणखी बरीच वाढेल. तो म्हणतो की, काल आम्ही सरावाला उतरलो तेव्हा वाटले की, किती दिवसांनंतर आपण खेळतोय. सरावाला जातानाच मी काहीसा बेचैन होतो, धाकधूक वाटत होती; पण नंतर सर्व काही ठीक झाले. खरं सांगायचे तर मला तेवढे खेळाबद्दल चुकचुकल्यासारखे वाटले नाही. कदाचित नऊ- दहा वर्षांत अशी विश्रांती मिळालीच नव्हती म्हणून असेल कदाचित. एवढा मोठा ब्रेक मिळेल असे वाटत नव्हते.

मी खेळाला मुकतोय इकडे माझे लक्ष नव्हते तर मी इतर गोष्टीत स्वतःला व्यस्त ठेवले होते. आठवत असेल तर यंदाच कोहलीने क्रिकेटच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमाबद्दल तक्रार केली होती आणि बहुधा खेळाडूंना आता थेट मैदानावरच उतरावे लागेल, अशी टीकासुद्धा केली होती. अशा व्यस्त कार्यक्रमातही थोडी थोडी विश्रांतीच आपली या खेळाची आवड टिकवून ठेवतेय असे त्याने म्हटले होते. यावेळी पर्यायच नव्हता आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा हीसुद्धा तेवढीच व्यस्त असते. म्हणून कोरोनाने घरी राहण्याची सवड दिल्याचा त्यांनी पुरेपूर आनंद घेतला.

कोहली म्हणतो, आम्ही दोघे एकाच वेळी घरी होतो ही सर्वांत चांगली गोष्ट झाली. एवढा वेळ आम्ही सोबत कधीच नव्हतो. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्हाला घरीच राहायला मिळतेय यापेक्षा चांगली गोष्ट काय असणार?आयपीएलसाठी असलेल्या बायो बबलबद्दल तो म्हणाला की, आम्ही येथे खेळण्यासाठी आलोय. मौजमजेसाठी नाही हे ध्यानात घेऊन प्रत्येक जण वागला तर त्रास होणार नाही. आताची परिस्थिती वेगळी आहे हे आम्ही मान्य करायलाच हवे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER