विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन विद्यापीठाचा निर्णय : उदय सामंत

Uday Samant

रत्नागिरी/प्रतिनिधी : येत्या तीन महिन्यांत विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन नंतरच रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ तयार करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. शिवाय, येत्या दोन महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात स्वतंत्र संचालक नेमण्याची घोषणाही मंत्री सामंत यांनी यावेळी केली.

शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता, नाणार प्रकल्पाला राष्ट्रवादीच्या नेत्यांचं समर्थन

मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारी तब्बल ८०० महाविद्यालये आणि आठ लाख विद्यार्थीसंख्येमुळे विद्यापीठाच्या प्रशासनावर प्रचंड ताण आहे. तसेच कोकणातील विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी अंतरामुळे मुंबई विद्यापीठ गैरसोयीचे आहे. त्यामुळे डावखरे यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली. तर, या लक्षवेधी सुचनेच्या चर्चे दरम्यान शिक्षक आमदार कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी मात्र कोकणातील जनतेची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी नाही अशी भूमिका मांडली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापण्याची मागणी केली आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदूर्गातील काही महाविद्यालयांनी कोकणाला मुंबई विद्यापीठाशीच संलग्न ठेवावे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे दोन वेगळे मतप्रवाह लक्षात घेता विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करूनच स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ९० दिवसांत विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतला जाईल. विद्यार्थी केंद्रस्थानी मानूनच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.