जाणू या प्रयोजन साहित्य निर्मितीचे

Know the purpose of material production

वाचाल तर वाचाल ! वाचत चला अस आपण नेहमीच म्हणतो. वाचनाने मला काय दिलं याचा विचारही आपण कधी तरी करतो. पण मुळात साहित्यिक साहित्याची निर्मितीच का करतो? हे साहित्यिकाच्या दृष्टीने आपण फार कधी बघत नाही.

का करत असेल बरं? वेळ जात नाही म्हणून! मी खूप बिझी आहे हे दाखवण्यासाठी ! की आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी ! पैसा मिळवण्यासाठी ? गमतीचा भाग सोडून द्या .पण त्यामागे काही उद्देश नक्की असणारच ! जगातल्या प्रत्येक वस्तूची निर्मितीचे काहीतरी प्रयोजन अवश्य असते. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. मग काय उद्देश असेल बरं ?

मी का लिहिते ? मी मलाच प्रश्न विचारला तर लक्षात आलं मला आनंद मिळतो. त्या निमित्ताने इतर वाचन वाढतं. दृष्टी व्यापक होत जाते. आजूबाजूच्या लोकांकडे ,घटनांकडे उघड्या डोळ्यांनी बघायची सवय लागते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून विचार करता येतो .म्हणजे ज्याला आपण सहवेदना म्हणतो. चिंतन-मनन होतं .एकूणच माझे स्वतःची चौफेर उन्नती होण्यासाठी मला मदत होते. आणि” जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे “या उक्तीप्रमाणे काही बरे विचार इतरांपर्यंत पोहोचवला येतात . मुख्य म्हणजे इतरांच्या आयुष्याकडे बघतांना, जगातील दुःख बघताना खूप काही शिकायला मिळतं ,म्हणजे त्या मानाने आपण किती सुखी आहे असं समाधान शिकवणारा धडाही मिळतो.

म्हणजे काही म्हणा कुठल्याही गोष्टीमध्ये काहीतरी प्रयोजन असतं. अशा दृष्टीने बघताना मग मी मागे जाण्याचा प्रयत्न केला. जुने साहित्य म्हणजे आपल्या संतांचे लिखाण. त्यामागे प्रयोजन हे निश्चितपणे लोकजागृतीचे ! लोकांना खऱ्या अर्थाने शहाणे करण्याचे होते. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने विविध प्रतीके वापरून जगण्याचे तत्त्वज्ञान सांगितले.

परंतु प्रत्येक मराठी संत कवीने आपल्या ग्रंथांच्या वाचनाची फलश्रुती सांगितली असते ती मात्र काव्य प्रयोजन नसते. मनाला न मानता व इंद्रियांना न कोंडता या ग्रंथांच्या श्रवण आणि मोक्ष आयताच मिळेल असे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी बाबत म्हणतात. ते ज्ञानेश्वरीचे अंतीम फळ आहे ,प्रयोजन नव्हे असे डॉक्टर मा गो देशमुख म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी ईश्वर गुणवर्णन व संत प्रेमसंपादन हे कवी च्या दृष्टीने प्रयोजन सांगितले तर वाचकांच्या दृष्टीने आनंदप्राप्ती हे प्रयोजन सांगितले असल्याचा निष्कर्ष डॉक्टर देशमुख यांनी काढला होता.

यासाठी संस्कृत साहित्यातील अनुबंध चतुष्ट्याची पद्धती प्रसिद्ध आहे. प्रत्येक ग्रंथकार ग्रंथारंभी आपल्या ग्रंथाचा विषय ,प्रयोजन ,संबंध तत्व व अधिकारी हे अनुबंध चतुष्ट्या सांगत असे.

भरत मुनि हे संस्कृत काव्य शास्त्र चे प्रथम आचार्य. काव्यात आणि नाटकात तेव्हा भिन्नता नव्हती तेव्हा एका श्लोकातून त्यांनी दुःखी व श्रमपीडित लोकांना नाट्यपासून सुखप्राप्ती होईल म्हणजे लोकहित धर्म, यश ,आयु, हित, ज्ञान व उपदेश ही प्रयोजने सांगितली.

आचार्य वामन यांनी एक प्रीती म्हणजे आनंद हे दृष्ट प्रयोजन ,तर दुसरे कीर्ती हे अदृष्ट प्रयोजन सांगितले. आचार्य मम्मटाचे संस्कृत काव्यशास्त्र ही स्थान महत्त्वपूर्ण आहे .त्यांनी काव्याची यशप्राप्ती ,धनप्राप्ती, व्यावहारिक ज्ञानाची उपलब्धी, अनिष्ठाचा नाश ,अलौकिक आनंदाची त्वरित प्राप्ती ही प्रयोजने सांगितली.

मात्र प्रयोजना बाबत ग्रीक साहित्यशास्त्रात बघितलं तर प्लेटो पूर्व टीकाकार काव्याची निर्मिती दैवी प्रेरणेने होते .कवीला कलेचे ज्ञान नसते, ईश्वराचा संदेश म्हणून तो ते करतो. स्वच्छेने नव्हे तर एक प्रकारच्या वेडाच्या स्थितीत करतो असा समज होता. होमर ने काव्याचे ध्येय आनंद देणे असून हा आनंद कलात्मक भ्रमातून (Illusion of art) निर्माण करतो असे म्हटले आहे .मात्र प्राचीनतम ग्रीक पौराणिक कथांमधून काव्याचे प्रयोजन मानव जातीला सभ्य व उदात्त बनविणे हेच असल्याचे स्पष्ट होते.

प्लेटोने नीती आणि सामाजिक उपयुक्तता यांच्या आधारावर काव्याची समीक्षा केली तरीही काव्यातून उपदेश दिला जावा अशी त्याची धारणा नव्हती. तर अरिस्टोटलच्या मते काव्य हा ज्ञानयोग नसून भावयोग आहे. सुसंस्कृत जनतेला इष्ट वाटणारा आनंद देणे हेच काव्याचे प्रयोजन होय. काव्य हा अनुभूतीचा विषय असून आनंदाचा मूळ आधार नीती आहे असं तो म्हणतो.

काव्याचे स्वरूप आणि प्रयोजना बाबत आरिस्टाटलची मते बऱ्याच अंशी प्राचीन भारतीय साहित्यिक व समीक्षकांशी जुळणारी ! तो त्याला “इमोशनल डिलाईट”म्हणतो. आणि त्यालाच आमचे आचार्य “रस” असे म्हणतात.

नाट्यशास्त्रात भरत मुनींनी विनोदजननम् , विश्रामजननम् , व लोकोपदेशजननम् , हि नाट्याची तीन प्रयोजने सांगितली त्यातील विश्रामजननम् हेच अरिस्टॉटल चे भावात्मक आनंद किंवा “कॅथोरसिस” होय. उत्तर रामचरित्र किंवा एकच प्याला यासारखी त्या वेळेची करुणरसप्रधान साहित्य किंवा आजच्या काळातही नाटक आणि सिनेमातील दुःखदायक दृश्य बघून वाईट वाटतं ,रडू येत परंतु तरीही ते पिक्चर किंवा नाटक आवडतं. म्हणजेच दुसर्‍याचे दुःख पाहून आनंद होतो का ?तर नाही ! त्यामुळे लेखकाच्या भावनांचे विरेचन होऊन त्याला स्वास्थ लाभते. यालाच मॉम ने कॅथरसिस हे नाव दिले. त्याने वाचकांच्या कॅथरसिस चा विचार केला नाही. ॲरिस्टॉटल ने मात्र म्हटलंय, अनुकंपा व भय या भावनांचा अविष्कार करून रसिकांच्या करुणा भावनांचे विरेचन केले जाते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील मुळचा क्षोभ कमी होतो. या भावना ओसरून मनाची शांतता येते ,असे गटे म्हणतो.” कॅथरसिस” विरेचन हा मूळ वैद्यकशास्त्रातील शब्द आहे.

याशिवाय काही पाश्‍चात्त्यांनी सांगितलेले प्रयोजने म्हणजे आधुनिक काळात साहित्याची प्रयोजने समजली जातात .ती थोडक्यात अशी की व्यावहारिक जीवनात अनेक दुःख येत असतात .त्यातून मुक्त होण्यासाठी आणि स्वतःला विसरण्यासाठी बहुदा अवास्तव आणि कल्पना रमणीय साहित्याचा उपयोग लोक करतात. व्यवहारातील मर्यादांमुळे आपल्या मनातील अपूर्ण इच्छा आकांक्षा वासना साहित्यातील कॅरेक्टर च्या माध्यमातून पूर्ण करणे म्हणजे स्वप्नरंजन व इच्छापूर्ती हे प्रयोजन असू शकते. सारेच साहित्य जिज्ञासा पूर्तीच्या प्रवृत्तीतून निर्माण होते .जिज्ञासा ही पण वांग्मयाचा लोकप्रियतेचे रहस्य आहे जिज्ञासापूर्तीतून वाचकाला आनंद मिळतो. कलेचे स्वाभाविक कार्य म्हणजे उद्बोधन. वाचकांना काहीतरी जाणून घ्यायचे असते. त्याचप्रमाणे लेखकालाही काहीतरी सांगायचे असते .त्यालाच आत्माविष्कार असं म्हणतात तो बहुतेक भावनांचा असतो.

फ्रेंड्स ! साहित्याच्या स्वरूपानुसार देखील त्याची प्रयोजन वेगवेगळी असतात. त्याचप्रमाणे अगदी आधुनिक साहित्याचे स्वरूप आणि त्याचे प्रयोजन हे खूप बदललेले आहे. एकूणच हा सगळा प्रवास खूप मजेशीर आहे. जितक खोल जावं तितक्या गमती यात बघायला मिळतात.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER