१० रुपयात शिवसेना देणार हे मराठमोळं जेवण

मुंबई : विधानसभा निवडणुकीला लक्षात घेता, प्रत्येक पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करून मतदारांना विविध आश्वासन देत आहे. यातच सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती म्हणजे शिवसेनेने जाहीर केलेल्या १० रुपयांच्या जेवणाची. आज शिवसेनेकडून मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या शिववड्याची किंमत १२ रुपये असताना १० रुपयात जेवण कसं देणार अशी टीका विरोधकांकडून शिवसेनेवर होत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्पष्टीकरण दीलं आहे.

ही बातमी पण वाचा : पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात; उद्धव ठाकरेंचा टोमणा

सुभाष देसाईंनी सांगितले की, वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करूनच १० रुपयाची भोजन थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठमोळ्या जेवणात १-२ चपाती, २-३ भाजी, वरण भात या एका थाळीचा खर्च ४० रुपये आहे. मात्र आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ही योजना लागू करु. यामध्ये १० रुपये ग्राहक देईल तर उर्वरित ३० रुपये सरकार अनुदान देईल. वर्षाकाठी १ हजार कोटी रुपये या योजनेला खर्च येईल. महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही अशी शिवसेनेची ही योजना आहे. वाढलेल्या उत्पन्नातून हा खर्च केला जाईल, त्यासाठी वेगळा कर लादला जाणार नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. त्यामुळे अन्नावर सध्या आम्ही भर दिला आहे.

तसेच शिवसेनेच्या या योजनेवर टीका करताना शरद पवारांनी झुणका भाकर केंद्र उघडले, त्या जागा शिवसेनेने बळकावल्या असा आरोप केला त्यावर सुभाष देसाई यांनी उत्तर दिले. शरद पवारांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे. झुणका भाकर केंद्राच्या जागा एवढ्या मोठ्या नाहीत. त्यांना जमिनी दिल्या नाही तर एनओसी दिल्या आहेत. जनतेचा पैसा हडप करणं हे काम राष्ट्रवादीचं आहे. त्यांचे मंत्री तुरुंगात गेलेले आहेत. राज्य सहकारी बँक, पेण अर्बन बँक या बुडविल्या कोणी? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केला आहे. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना राज्य चालवायचं आहे की, स्वयंपाक करायचा आहे अशी टीका केली. त्यावरही स्वयंपाक करणारे दुसरे असतील आम्ही फक्त नियोजन करणार आहोत, अशा शब्दात सुभाष देसाईंनी विरोधकांना चिमटा काढला.