चाकूचा धाक दाखवत केलेली २० लाखांची चोरी उघडकीस; चोवीस तासात रत्नागिरी पोलिसांची गुन्हेगारांना अटक

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी शहराच्या आरोग्यमंदिर भागात भर दिवसा केलेल्या चोरीचा छडा रत्नागिरी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत लावला असून आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात त्यांना यश आले आहे. रत्नागिरी शहराच्या आरोग्यमंदिर भागात भरवस्तीत सायंकाळी साडेचारच्या सुमाराला युवकाला रस्सीने बांधून ठेवत सुमारे अठरा लाख रुपये किंमतीचा लॅपटॉप, मॉनिटर, हेडफोन, डिव्हीआर असा ऐवज पळवण्यात आला होता. याविषयी वेगाने तपास करून महेश रामचंद्र चौगुले (वय 33 रा. सांगलवाडी सांगली), सुरज सदाशिव निकम (वय 25 रा. कडमवाडी रोड सांगलवाडी सांगली), सुनिल चंद्रकात घारेपडे (वय 30 कर्नाळा नांदेरेराडे ता. मिरज जि. सांगली), रेवणसिधु हनुमंत बगले (वय 19 रा. सांगलवाडी सांगली) यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीला गेलेल्या मालापैकी 14,23,163.50 रुपये किंमतीचे 36 टॅपटॉप, 58,208/- रुपये किंमतीचे 11 मॅनिटर, 2035/- रुपये किंमतीचा 1 हेडफोन, गुन्हयात वापरलेले हत्यार (चाकु) असा सर्व माल व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा 5,00,000/- रुपये किंमतीची गाडी (क्र. एमएच 12 एफके 6050) असा एकुण 19,83,406.50/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

भारतीय मराठा संघाच्या वतीने महिलांकरिता आरोग्य शिबीर

सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. प्रविण मुंढे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड, मा.उप-विभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी श्री.गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री अनिल लाड, डी.बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रायसिंग पाटील यांनी पार पाडली.