केकेआरची जादुई कामगिरी : आठ फलंदाज एकेरीत बाद तरी मारली दोनशेवर मजल

Maharashtra today

आयपीएलमधील (IPL) बुधवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दिलेली झुंज दीर्घकाळ स्मरणात राहील. ज्या संघाची ५.२ षटकांतच ५ बाद ३१ अशी अवस्था होती त्या संघाने शेवटी २०२ धावांपर्यंत मजल मारावी हेच आश्चर्य होते आणि हे आश्चर्य त्यांच्या सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी घडवले होते. आयपीएलमध्ये या प्रकारे एवढ्या चांगल्या पद्धतीने कोणताही संघ सावरला नव्हता.

सीएसके विरुद्धच्या या सामन्यातील केकेआरच्या २०२ धावा ह्या आठ फलंदाज एकेरी धावात बाद झालेल्या संघाच्या टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा आहेत. या डावात नितीश राणा (९), शुभमन गील (०), राहुल त्रिपाठी (८), ओईन माॕर्गन (७), सुनील नरीन (४) आणि कमलेश नागकोटी, वरुण चक्रवर्ती व प्रसिद्ध कृष्ण हे तिघे शून्यावर बाद झाले तर दिनेश कार्तिक (४०), आंद्रे रसेल (५४) व कमिन्स (नाबाद ६६) या तिघांनीच धावा केल्या.

याच्याआधी एवढे फलंदाज एकेरी धावात बाद होऊन उभारलेली सर्वोच्च धावसंख्या १७५ होती जी २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध उभारली होती. चार फलंदाज शून्यावर बाद होऊनही २०० वर पोहचलेला केकेआर हा टी-२० मधील एकमेव संघ आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या सहाव्या क्रमांकापासूनच्या फलंदाजांनी धावसंख्येत घातलेली १७१ धावांची भर हा आयपीएलमध्ये पहिले पाच गडी गमावल्यानंतरच्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. याच्याआधी २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्सने गुजरात लायन्सविरुद्ध ५ बाद २९ नंतर १३० धावा जोडत चार गड्यांनी सामना जिंकला होता. तर एकूणच टी-२० क्रिकेटमध्ये १८४ धावांसह हा विक्रम जमैका तलावाजच्या नावावर आहे. त्यांनी ५ बाद ४१ वरून सावरत त्रिन्बागो नाईट रायडर्सविरुद्ध २२४ धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले होते. विशेष म्हणजे त्या सामन्यातही आंद्रे रसेलने कलाटणी देणारी ४९ चेंडूंत १२१ धावांची खेळी केली होती. २०१८ च्या सीपीएलमधील हा सामना म्हणजे आतापर्यंत एखाद्या संघाने पहिले पाच गडी ५० धावांच्या आत गमावल्यावर २०० वर मजल मारलेला एकमेव सामना होता. आता केकेआर त्याच्या पंक्तीत आले आहे.

केकेआरच्या याच डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला पॕटरसन कमिन्स हा ३४ चेंडूंतच ४ चौकार व ६ षटकारांसह केलेल्या ६६ धावांवर नाबाद राहिला. ही आयपीएलच्या इतिहासातील आठव्या किंवा खालच्या क्रमांकावरील सर्वोच्च खेळी आहे. यापूर्वी २०१५ च्या आयपीएलमध्ये हरभजनसिंगने आठव्या क्रमांकावर खेळताना ६४ धावांची खेळी केली होती.

याशिवाय सातव्या किंवा खालच्या क्रमांकाच्या एकापेक्षा अधिक फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केलेला हा आयपीएलमधील एकमेव डाव ठरला. टी-२० क्रिकेटचा विचार केला तर असा आणखी एकच सामना आहे ज्यात २०१२-१३ च्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत जम्मू आणि काश्मीरच्या तळाच्या फलंदाजांनी हरियाणाच्या नाकीनऊ आणले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button