किस्से हायकोर्टातील-३ शिळी वृत्तपत्रे व बेजार झेरॉक्स मशिन

High court

Ajit Gogateआज मी तुम्हाला जे दोन किस्से सांगणार आहे त्यातील पहिला किस्सा हायकोर्टाचे प्रशासन कसे झापडबंद पद्धतीने चालायचे याचा आहे. दुसर्‍या किश्श्यातून तुम्हाला, ‘माणूस कितीही मोठया पदावर असला तरी, त्याची फुकट मिळेल ते घेण्याची वृत्ती’ कशी जात नाही, हे दिसेल.

वृत्तपत्रेही ‘सीनिऑरिटीने’

असाच एक दिवस कोर्टाचे काम संपण्याच्या सुमारास, एका न्यायाधीशास भेटण्यासाठी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो. साहेब आलेले नव्हते म्हणून ‘पीए’ने बसायला सांगितले. थोड्या वेळाने साहेब आल्याची चाहूल लागताच ‘साहेब, गोगटे आलेत’, असे सांगत त्याने मला आत सोडले. आत गेल्यावर ‘बसा,एक मिनिटात फ्रेश होऊन येतो’ असे सांगून साहेब वॉशरूमला गेले. समोर टेबलावर वृत्तपत्रांचा जाडजूड गठ्ठा ठेवलेला होता. नुसते बसण्यापेक्षा मी तो गठ्ठा जवळ ओढून पाहू लागलो. गठ्ठ्यातील सर्व वृत्तपत्रे २०-२५ दिवसांपूर्वीची जुनी होती!

साहेब फ्रेश होऊन आले. ख्यालीखुशालीचे बोलणे झाल्यावर मी विचारले, ‘ काही संदर्भ पाहण्यासाठी हे जुने पेपर मागविलेत का?’  साहेब हसले व ‘नाही’ एवढंच म्हणाले. माझा चेहरा आधीहून जास्त प्रश्नार्थक झाला. माझी उत्सुकता अधिक न ताणता साहेबांनी ‘आमचे लोक नं एकदम बिनडोक आहेत’ अशी सुरुवात करून जी मजेशीर माहिती दिली त्याचाच हा किस्सा.

त्यावेळी हायकोर्टात मुंबईतून प्रसिद्ध होणार्‍या  निदान सर्व इंग्रजी दैनिकांच्या व नियतकालिकांच्या दररोज दोन प्रती घेतल्या जायच्या. (कदाचित अजूनही घेत असतील.) एक ‘लॉर्डशिप’ मंडळींच्या व्यक्तिगत वाचनासाठी व दुसरी त्यांच्या लायब्ररीसाठी. हुतात्मा चौकात पेपर विकणारा भैय्या सकाळी धंदा लावला की, हायकोर्टाच्या पेपराचे दोन गठ्ठे ‘कोर्ट कीपर’कडे आणून द्यायचा.

लायब्ररीत ताजीच नाहीत तर जुनी वृत्तपत्रेही अनेकांना वाचता येतात. पण प्रत्येकी एकच प्रत असलेली वृत्तपत्रे ६०-७० न्यायाधीशांना त्यांच्या चेंबरमध्ये व्यक्तिगत वाचनासाठी कशी काय पुरतात, असा मला प्रश्न पडला. पण या शंकेचे निरसनही न्यायाधीशसाहेबांनीच केले.

वृत्तपत्रे न्यायाधीशांना त्यांच्या ‘सीनिऑरिटी’नुसार वाचायला देणे, हा तोडगा प्रशासनाने काढल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे कसे, असा प्रश्न तुम्हाला सहाजिकच पडेल. सांगतो ! म्हणजे असे की, रोज ताजी वृत्तपत्रे आली की तो गठ्ठा सर्वप्रथम मुख्य न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये पाठवला जायचा. तेथे तो ‘ये कचरा उठाओ’, असे सांगे पर्यंत कित्येक दिवस  पडून राहायचा. मग तो गठ्ठा सिनिऑरिटीच्या क्रमाने येणार्‍या दुसर्‍या , तिसर्‍या, चौथ्या अशा पुढील न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जायचा. अशा रितीने रोज ताजी म्हणून घेतली जाणारी वृत्तपत्रे क्रमवारीतील शेवटच्या न्यायाधीशाच्या चेंबरमध्ये पोहोचेपर्यंत चांगली दीड-दोन महिन्यांची शिळी झालेली असायची ! त्या न्यायाधीश साहेबाच्या चेंबरमधील पेपरचा गठ्ठा म्हणूनच असा शिळा होता.

बरं मजेची गोष्ट अशी की, न्यायाधीशांना त्यांच्या नोकरीच्या सुविधेतील भाग म्हणून वृत्तपत्रे घरीही मिळतात. जी काय वाचायची, ती ते घरी वाचतात. न्यायालयात आल्यावर कामाच्या व्यापात  त्यांना त्यांच्याकडे ढुंकूनही पाहायला वेळ मिळत नाही. असे असूनही न्यायाधीशांच्या व्यक्तीगत वाचनासाठी म्हणून वृत्तपत्रांचा एक संच त्यावेळी नियमितपणे घेतला जायचा.मग तो, कोणीही न वाचता शेवटी काही महिन्यांनी रद्दीत जायचा. याच्यासाठी लागणारे  पैसे मात्र तुमच्या आमच्या खिशातून अप्रत्यक्षपणे दिले जायचे ! पुढे ही निरर्थक व अपव्ययी पद्धत बंद व्हायला आणखी काही वर्षे जावी लागली.

दुसर्‍या बेजार झेरॉक्स मशिन

पूर्वी हायकोर्टात किंवा अन्य न्यायालयांतही ‘सर्टिफाईड कॉपी’ देण्यासाठी संबंधित निकालपत्र पूर्णपणे नव्याने टाइप करायला लागायचे. एकाने टाइप केलेले दुसरा, मूळ बरहुकूम आहे की नाही, हे ताडून पाहायचा व खात्री झाली की, सही शिक्का मारून ‘सर्टिफाईड कॉपी’ दिली जायची.

झेरॉक्स तंत्रज्ञान आले आणि मोठी सोय झाली. बाजारात झेरॉक्सची दुकाने सुरु होण्याच्या कित्येक महिने आधी हायकोर्टाने तसे एक मशिन घेतले. एका ऑफिसच्या खोलीच्या कोपर्‍यात प्लायवूडने एक बंदिस्त जागा तयार केली गेली. तेथे मशिन बसविले गेले व ते चालविण्यासाठी एक कर्मचारी नेमला.

मागील एका किश्श्यात उल्लेख केलेला माझा हायकोर्टात नोकरी करणारा मित्र संजय सुर्ते या झेरॉक्स मशिनवरून कॉपी काढायला जायचा. एकदा, दिलेले चार कागद ,आठ दिवस झले तरी झेरॉक्स केले नाहीत, म्हणून तो त्या ऑपरेटरेटरला शिव्या देत होता. नमके काय झाले असावे ते पाहण्यासाठी त्याच्याबरोबर त्या झेरॉक्स मशिनच्या प्लायवूडच्या खोलीत गेलो.
तेथे कॉपी काढायच्या कामाचे गठ्ठे दोन टेबलांवर रचून ठेवलेले होते. एक तंत्रज्ञ मशिन खोलून ते दुरुस्त करत होता. मशिन सारखे सारखे बंद पडते म्हणून ऑपरेटर त्याच्यावर रागावला होता. शेवटी तो तंत्रज्ञ ऑ परेटरला म्हणाला, ‘तुमच्या साहेबांना नवीन मशिन घ्यायला सांगा!  कंपनीच्या नावाची पट्टीच तेवढी ओरिजिनल शिल्लक आहे. बाकीचे सर्व पार्ट दोन-तीन वेळा बदलून झाले आहेत!! आता हे मशिन दुरुस्त होण्यातले नाही.’

चौकशी केली तेव्हा कळले की, नवे मशिन घेऊन चारच महिने झाले होते. म्हणून ऑपरेटरला विचारले, ‘एवढं काम असतं का हो?‘. तो म्हणाला, ‘ ऑफिसचं काम हे टेबलावर तसंच पडलंय. घरच्या कामांनीच मशिनची ही अवस्था झालीयं’. झाले होते असे की, बाहेर कुठे झेरॉक्सची सोय नव्हती. त्यामुळे ‘साहेबां’च्या घरून मुलांच्या अभ्यासाच्या नोट्स्, बाईसाहेबांची कूकरी व फॅशन मॅगेझिन्स झेरॉक्स करण्यासाठी आणली जायची. या घरच्या, खासगी कामांनीच ते मशिन एवढे बेजार झाले होते. त्यावेळी दिलेली बातमी ‘हायकोर्टाच्या झेरॉक्स मशिनची खासगी कामांनी दमछाक!’ या मथळ्याने झळकल्यानंतर नवे मशिन आले व त्यावर फक्त ऑफिसचेच काम करणे सुरु झाले.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER