या पती – पत्नीमुळेच महाविकास आघाडी स्थापन झाली !

Amruta And Devendra Fadnavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आवरा, अशी विनंती शेतकरी कार्यकर्ते आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याकडे केली आहे. पत्राच्या माध्यमातून किशोर तिवारी यांनी त्यांच्या मनातली सल बोलून दाखवली असून संघाने यात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात बांगड्या या विधानावरून कलगितुरा रंगला होता. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आणि मग आदित्य ठाकरे व अमृता यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. यावरूनच किशोर तिवारी यांनी या दोघाही पती पत्नींना आवर घालण्याची विनंती संघाकडे केली आहे.

पत्रात किशोर तिवारी म्हणतात –
शिवसेना-भाजप हे दोन हिंदुत्ववादी पक्ष भविष्यात जवळ येतील, असे आपणास वाटत असले तरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील दरी आणखी वाढत आहे, असा उल्लेख तिवारी यांनी भय्याजी जोशींना लिहिलेल्या पत्रात केला आहे. एवढेच नाही तर अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अशा विधानांमुळेच महाविकास आघाडी स्थापन झाली.

तिवारी यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांच्या पत्नी राजकारणावर भाष्य करताना दिसलेल्या नाहीत, असे सांगत अमृता फडणवीस राजकारणात करत असणारा हस्तक्षेप हा अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला भाजपमध्ये महिला नेतृत्वाचा अभाव आहे. ही जागा घेण्यासाठी अमृता फडणवीस यांची धडपड सुरु आहे का? असा सवालही तिवारी यांनी उपस्थितीत केला आहे. जो प्रकार सुरु आहे त्याकडे वेळीच लक्ष घातल नाही तर २०२४ च्या आगामी निवडणुकीत भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागले, असेही तिवारींनी म्हटले आहे.