गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा; किशोरी पेडणेकरांचे आवाहन

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना लसीचा (Corona vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, लस उपलब्धतेवरून खोटे दावे केले जात आहे, असा दावा गळे काढणारे करत आहेत. मुंबईकरांनो, गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले.

मुंबईत आजपासून वीकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचा अंमलबजावणीची पाहणी केली. यावेळी त्यांनी काही कोविड सेंटर्सचीही पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. हॉस्पिटलचा लसीचा शून्य साठा आहे. एक-दोन दिवसांचाच साठा उपलब्ध आहे. रुग्णालयाची आकडेवारी कशी खोटी असू शकते? इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाणही कमी आहे. आकडेवारीवरून ते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. गळे काढणे हे त्यांचे कामच आहे, असा चिमटा किशोरी पेडणेकर यांनी काढला.

लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

“काही लोक गळे काढत होते. आता त्यांच्या घरातील पत्नी आणि मुलीसुद्धा बोलायला लागल्यात. राजकारण करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. पुण्याला अतिरिक्त लस दिली की नाही माहीत नाही. परंतु, लस देताना मुंबईला डावलले जाऊ नये. राज्यात पूर्ण लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. लोकांचा विचार करूनच ते निर्णय घेतील.” असे पेडणेकर म्हणाल्या.

बेड्स अडवल्यास कारवाई

पेडणेकरांनी खासगी रुग्णालयांचीही पाहणी केली. मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. लक्षणे नसतानाही खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण बेड अडवत आहेत. त्यांनी पालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये यावे. ज्यांना ICU बेडची नितांत गरज आहे, त्यांना ते बेड मिळाले पाहिजे, विनाकारण लक्षणे नसलेल्यांनी बेड्स अडवून ठेवू नये, कोणत्याही रुग्णालयाने बेड अडवून ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही पेडणेकरांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button