हिंदुत्वाचा मुद्दा : मुख्यमंत्र्यांना राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का? – भाजप

Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई : मला मुख्यमंत्र्यांविषयी सहानुभूती आहे. मात्र, राज्यपालांसारख्या वयस्कर व्यक्तीशी बोलताना उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अहंकारी भाषेचा वापर करणे कितपत योग्य आहे, असा सवाल किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उपस्थित केला आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ही सर्व परिस्थिती हाताळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडत आहे.

त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. परिणामी त्यांचा तोल जाऊ लागला आहे- अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रतिहल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला चोख भाषेत प्रत्युत्तर दिले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे त्यांनी राज्यपालांना सांगितले. याच मुद्द्यावरून आता भाजप नेते मुख्यमंत्र्यांना सुनावत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच आता किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी खूप मोठी तडजोड केली. अशातच कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्यांना  सध्या प्रत्येक गोष्टीचा राग येत आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना त्यांचा तोल गेला- अशा शबंदांत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर  शाब्दिक हल्ला चढवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला मुख्यमंत्र्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?
माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे; मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER