किरणला मिळाली डबल ट्रीट

खूप मेहनत केल्यानंतर एखाद्या कलाकाराचं जेव्हा कौतुक होतं, त्यासाठी पुरस्कार मिळतो तेव्हा त्याला आनंदच होत असतो. एक बक्षीस मिळालं की त्यासोबत अजून एखादी संधी मिळावी असं वाटणेही स्वाभाविक आहे. आणि मग अशी एका कौतुकाची अपेक्षा केली असता ती अपेक्षा तर पूर्ण होतेच पण त्याचवेळी दुसरी संधीही तुमच्या नशीबाचे दार ठोठावते तेव्हा मग आनंदाला आकाशही ठेंगणे होते ना. अशी डबल ट्रीट आपल्याही आयुष्यात मिळावी असं स्वप्न अभिनेता किरण गायकवाड (Actor Kiran Gaikwad) याने कित्येक वर्षे डोळ्यात साठवलं होते. गेल्या आठवड्यात त्याच्या दोन्ही स्वप्नांनी किरणची ओंजळ भरली आणि त्याला तर ही डबल ट्रिट मिळालीच पण त्याच्या चाहत्यांनाही त्याने खूश केलं. सर्वोत्कृष्ट खलनायक आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा या पुरस्कारावर किरणने नाव कोरलच, पण त्याच पुरस्कार सोहळ्याचे निवेदन करण्याची त्याची स्वप्नपूर्तीही झाली. सध्या किरणला मिळालेल्या अ‍ॅवार्डची तर चर्चा आहेच पण हे दोन्ही पुरस्कार हातात घेतलेल्या फोटोसह किरणने सोशलमीडियावर (Social Media) शेअर केलेली भावूक पोस्टही खूप व्हायरल झाली आहे.

सातारा जिल्ह्यात घडलेल्या एका सत्यघटनेवर सध्या देवमाणूस या मालिकेने मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. डॉक्टरच्या सभ्य चेहऱ्याआड लपलेल्या खुनी माणसाची व्यक्तीरेखा किरणने लिलया पेलली आहे. या मालिकेसाठीच किरणला अ‍ॅवार्ड मिळाले.

किरणची नायक म्हणून ही पहिलीच मालिका आहे. यापूर्वी किरणने लागिरं झालं जी या मालिकेत भैयासाहेब हे पात्र रंगवलं होते आणि त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. तर दरम्यान किरणने टोटल हुबलाक ही मालिका केली पण त्या मालिकेची भट्टी काही जमली नाही. त्यानंतर आलेल्या देवमाणूस या मालिकेने किरणला स्टार केलं. आज किरण सेलिब्रिटी झाला असला तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे हेच त्याच्या या अ‍ॅवार्ड घेतल्यानंतरच्या पोस्टमधून दिसून येतं. किरणने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की या दिवसाची वाट मी गेल्या कित्येक वर्षापासून पाहत होतो. छोट्या पडद्यावरील असो किंवा मोठ्या पडद्यावरील . पुरस्कार सोहळे पाहताना मला नेहमी असं वाटायचे, की मी कधी त्या मंचावर पुरस्कार घेण्यासाठी जाईन… आईसोबत जेव्हा मी सोहळा टिव्हीवर पाहायचो तेव्हा आईने माझी ती तळमळ पाहिली आहे. अ‍ॅवार्ड फंक्शनमध्ये सेलिब्रिटी डान्स करताना पाहून तर मी घरातच थिरकायचो. मी कधी करेन या मंचावर डान्स हा उत्सुकतेचा प्रश्न कित्येकदा मी स्वत:ला विचारायचो. पण त्यासाठी मेहनतही करावी लागणार ही खूणगाठ बांधून नाटकांच्या तालमी, प्रयोग करत राहिलो. देवमाणूस या मालिकेची संधी आली आणि माझ्या स्वप्नाकडे जाण्याचा मार्ग मिळाला. ही मालिका पाहून मला माझी आईही एकदा ओरडली होती. ती म्हणाली होती की इतकी हाव करू नकोस पैशाची. तिची ती प्रतिक्रिया खूप बोलकी होती. आज याच मालिकेसाठी दोन पुरस्कार मला या मंचावर स्वीकारता आले याचा खूप आनंद आहे. अशाप्रकारच्या सोहळ्याचे निवेदन करण्याचेही स्वप्न मी पाहिले आणि ते स्वप्नही पूर्ण झाले.

किरण गायकवाडला व्यायामाची आवड असून सध्या देवमाणूस या मालिकेसाठी सातारा मुक्कामी असतानाही तो न चुकता व्यायाम करतो. खर तर ही मालिका त्याला मिळाली तेव्हा त्याला आठ किलो वजन कमी करायचे होते. ते आव्हान किरणने 15 दिवसातच पूर्ण केलं. किरणने यापूर्वी बघतोस काय मुजरा कर, फुंत्रू, वायझेड या सिनेमात काम केलं आहे. तसेच बकाट हा त्याचा सिनेमा लवकरच येणार आहे. सोशलमीडियावर किरण नेहमीच सक्रिय असतो. खूप संघर्षानंतर मिळणाऱ्या संधीचे कसे सोने करावे हे किरणने त्याच्या कामातून दाखवून दिले आहे आणि त्याचीच पावती म्हणून दोन पुरस्कारांसह सोहळ्याचे निवेदन अशी फटकेबाजी करत किरणने बाजी मारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button