
छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) आपल्या सगळ्यांना ओळख होते ती अगदी बालपणापासूनच . आपल्या घरातील मोठी माणसे आपल्याला शिवबाच्या आणि मावळ्यांच्या गोष्टीचा सांगतात .नंतर हळू हळू अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास येतो .मग त्यातील आग्राहून सुटका, पावनखिंडीतील लढाई यासारख्या गोष्टी बाल मनाला वेड लावतात.
माझंही असंच झालं. त्यातून मग राजा शिवछत्रपती हे श्री .बाबासाहेब नाना पुरंदरे यांचे पुस्तक खुणावू लागले आणि शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्त्व या पैलूंचा शोध सुरू झाला .कारण त्यांचे शौर्य धैर्य आणि लढवय्येपण ,लष्करी डावपेच हे तर कळले होतेच .पण एकूणच अनेक प्रसंगातून ते एक व्यक्ती म्हणून कसे होते ? ते वागायचे कसे ? त्यांच्या माणसे जोडण्याच्या कुशलतेची जाणीव होऊ लागली .त्यातून व्यक्तिमत्त्वाचे वेगळे आयाम दृष्टीस पडले.
यांची प्रशासन पद्धती, प्रशासकीय कौशल्य ,राजभाषा म्हणून मराठीचे महत्व वाढविणे आणि त्याच बरोबर एक व्यक्ती म्हणून सहृदयता ! दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून विचार करण्याची पद्धती, माणसांना जपण्याची पद्धत या सगळ्यांनी माझ्यावर गारुड घातले. “ते अगदी माणसाचे माणूस वळ – खतात हेच खरे ! “आपण त्यांचे चाहते फक्त ,त्यांच्या स्तुतीचे गुणगान करीत नाही, तर अगदी शत्रू सुद्धा त्यांचे गुणवर्णन करत असतं. इ स १६६७मध्ये गोव्याचा व्हाइसरॉयने त्यांच्या पोर्तुगलचा राजाला पत्र लिहिले होते .त्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना त्यांची तुलना जागतिक कीर्तीचे नेते ज्युलिअस सीझर आणि अलेक्झांडर यांच्याबरोबर केली होती .ते महाराजांचे गुणवर्णन करताना म्हणाले आहेत कि ते चाणाक्ष, शूर, चपळ ,लष्करी डावपेच माहित असणारे असे होते .खुद्द औरंगजेब सुद्धा त्यांच्या कार्याचे आणि कल्पकतेच कौतुक करत होता . शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एकोणीस वर्षानंतर सुद्धा मला आज पर्यंत त्या भूमीवर कब्जा करता आलेला नाही इतकी त्यांनी बनवून ठेवलेली व्यवस्था सुव्यवस्थित आणि खंबीर आहे. औरंगजेबाने केलेल्या या प्रशंसेमध्येच सगळं काही आलं.
शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय दृष्टिकोनातला, कुठला व्यक्तिमत्त्वाचा भाग असा होता ? प्रशासनाची ही खुबी त्यांना मिळाली कुठून ?काय जादू होती त्यांच्याकडे ?माणसं कशी जोडली जायची ? असा विचार केल्यानंतर काही उदाहरणं दृष्टीपथास येतात.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रजेप्रति त्यांच्या मनामध्ये असलेली तदनुभूती ! प्रजेविषयीच प्रेम !
१६७० मध्ये आग्र्याहून परत आल्यावर राज्य व्यवस्थेची घडी परत बसवण्यास सुरुवात केली. अशावेळी निळोपंत सोनदेव, यांच्याकडे प्रशासनाची सूत्रे सोपवण्यात आली होती. परंतु सगळीकडे मोहिमा सुरू होत्या. एक एक गड सर केल्या जात होते. आपसूकच निळूपंतांना मोहिमेवर जावे आणि शौर्य गाजवावे असे वाटायचे. त्यावर शिवाजी महाराजांनी त्यांना समजवलं की ,तितकीच महत्त्वाची आहे मुलुख गिरी ! प्रजेच संगोपन कोण करणार? त्यांच्या ‘संगोपन ‘या शब्दातच त्यांचा प्रजेकडे बघण्याचा दृष्टीकोण समजून येतो.
अशीच नौदलाची बांधणी करणे चालू होते. त्यासाठी मग लाकूड कुठून मिळणार? काय काय करावे लागेल? अशी चर्चा सुरू होती. काही लाकूड सरकारी मालकीची जंगलं आहेत त्यातून मिळू शकेल, नाही तर काही खुल्या बाजारातून. परंतु आंबे आणि फणसाच्या झाडा तून सुद्धा हे मिळू शकेलं, पण ते घेऊ नका, कारण ही झाडं तोडायला वेळ लागणार नाही .परंतु ती अतिशय कष्टाने अनेक वर्षांपासून लोकांनी वाढवलेली आहेत आणि अक्षरशः बाळासारखी त्याची जोपासना ही केलेली आहे. म्हणजे एकीकडे कर्तव्यकठोर असणारा हा राजा काही ठिकाणी सर्वसामान्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करून नंतर योग्य तो मार्ग कसा काढतो याचे हे उदाहरण. कुठेही वाहवत जात नाही. म्हणजे एकाच वेळी यंत्रणा उभारणीही करायची आहे,पण त्याच वेळेला प्रजेच्या मनाची पण काळजी घ्यायची आहे, आणि तरीही त्यातून मार्ग हि काढायचा आहे.
आणि म्हणूनच शिवाजी ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती एक वृत्ती आहे असेच म्हणावे लागेल. शेजवलकर हे एक मोठे इतिहासकार होऊन गेले. त्यांनी शिवजन्माचा दिवसापासून त्यांच्या निधना पर्यंतच्या तारखेचे अचूक मोजमाप ,प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने केलेले आहे. म्हणजे ते किती दिवस जगले ?किती दिवस ते प्रत्यक्ष युद्धात होते ?किती दिवस महाराष्ट्र बाहेर होते?. या सगळ्याचा हिशोब मांडलेला आहे. दिवसांच्या हिशोबानंचे मोजमाप बघता प्रत्यक्ष युद्ध भूमीवर असण्याचा काळ फार नाही. पण त्यांची व्यवस्था आणि माणसे इतकी तयार होती की प्रत्येक वेळी तिथे प्रत्यक्ष शिवाजी महाराज हजर असण्याची गरज नव्हती. अधिकाऱ्यांच्या मनाला कसे समजवायचे हेही त्यांना चांगले अवगत होते. जेव्हा नेत्यांमध्ये दूरदृष्टी कळते, त्यांच्या विचारांना मधली स्पष्टता जाणवते. तेव्हा आपोआपच अनुयायी जोडले जातात. हे सगळं महाराजांमध्ये निर्माण कुठून झालं ?
बाराव्या वर्षी वडिलांच्या सोबत झालेल शिक्षण, गुरु दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन, जिजाऊंचा सहवास, त्याच बरोबर कौटिलीय अर्थशास्त्र आणि शुक्र नीतिसार या ग्रंथांचा पण प्रभाव त्यांच्या तत्कालीन व्यवस्थेवर दिसून येतो. तत्कालीन रीती व्यवस्थे पेक्षा शिवाजी महाराजांची व्यवस्था खूप वेगळी आहे. त्यांनी त्यांचं स्वतःचं मंत्रिमंडळ निर्माण केलं आणि आपल्या भाषेतील नावे त्यांना दिली. पदाप्रमाणे सचिव ,अमात्य ,मुख्य प्रधान ,सेनापती, पंडितराव, डबीर इत्यादी. तसेच त्यांचे कर्तृत्व आणि गुणवत्तेच्या जोरावर केंद्र सरकारकडून कारखानिस ,पोतनीस ,सबनीस अशा जबाबदाऱ्या सोपवल्या. पुढे तीच आडणावे म्हणून कायम राहिली. त्यांना कुठलीही वतनदारी न देता त्याच्या पेक्षा वेगळे पगार देणे सुरू केले. कुठलीही गोष्ट महाराजांपर्यंत येण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा क्रम त्यांनी ठरवून दिला. म्हणजे कारकुना पासून महाराजांपर्यंत कागद येईपर्यंत त्याच्यावर कोणाकोणाच्या सह्या असतील हे ठरवून दिलं. आपला मोठेपणा न वाढवून वैयक्तिक प्राधान्य प्रशासनात येण्यापासून परावृत्त केले गेले.
वतनदार हे त्यांच्या त्यांच्या स्थानिक पातळीवर राजेच होतात, पूर्ण सत्ता ते स्वतःकडे केंद्रित करून घेतात. त्यांनीही वतनदारी मोडीस काढली. त्यांच्याकडून कर वसुलीचा अधिकार काढून घेतला आणि विशिष्ट पगार जिल्हा खजिन्यातून देण्याचे ठरले. त्यांच्यासाठी असलेल्या गढी काढून घेऊन साध्या घरांमध्ये त्यांना राहावे लागेल असे ठरले. खेडे हे प्रशासनाचं केंद्र मानलं. स्थानिक नागरिकां चा कामकाजात सहभाग घेण्यासाठी त्यांना निवडीचा अधिकार मिळाला.
छत्रपतींचे वैशिष्ट्य हे की त्यांनी पूर्वीची व्यवस्था खिळखिळी केली. पूर्ण मोडिस काढली नाही. मुलकी किंवा लष्करी प्रत्येकाला पगाराचे मोठे पॅकेज ठरवून दिले. मोठी जहागीरदारी मात्र पूर्ण काढली.
आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये त्यांनी अठरा खाती कारभारासाठी आणि बारा खाती महालासाठी अशी व्यवस्था सुरु केली आणि अगदी कुमार अवस्थेतच असताना त्यांची इ .स .१६४७ मध्ये राजमुद्रा आली. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे सील फारसी भाषेमध्ये असायच्या. महाराजांनी पहिल्यांदा संस्कृत मध्ये मुद्रा काढली .त्याचा मथितार्थ असा की प्रतिपदेपासून चंद्राच्या कला जशा वाढत जातात तसा शहाजीराजांचा मुलगा शिवाजी ही लोककल्याणासाठी विराजत आहे. त्यांचे उद्दिष्ट अतिशय व्यापक होते .राज्यव्यवहार कोषग्रंथ सुद्धा त्यांनी आपल्या भाषेत लिहून घेतला त्यामुळे सर्व व कागदपत्रे कामकाजाची भाषा मराठी वापरायला सुरुवात झाली. त्यांनी आपल्या मराठी भाषेला मिळवून दिलेला हा गौरव. राजवाडा इतिहासकार म्हणतात की, इ स १६२८ मध्ये १४.४% तर इ स१६७७ मध्ये ६२% आणि पुढे पेशवाईत इ स मध्ये तर ९३.७% इतकी मराठी वापरली गेली. याची पाळेमुळे मात्र शिवछत्रपतींनी रुजवली.
शिवाजी महाराज “माणसाचे माणूस वळखतात हेची खरे ! “प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी नाती कशी जोडत जायची हे महाराजांकडून शिकावे. जेव्हा एका गडाच्या चढाईवर जाण्यासाठी एक सेनापती दरबारात विडा उचलण्यासाठी आला, त्यावेळी महाराजांनी कडेही त्याला त्याच वेळेला देऊन दिले. दरबारातल्या लोकांना आश्चर्य वाटले. त्यावेळी त्यांनी सांगितले की तो गड पत्ते करणारच याची खात्री आहे म्हणून कडे दिले. सिंहगडा च्या अनुभवानंतर मला हे कळले. म्हणजे रणभूमी वरून तो मावळा परत येईल की नाही याची खात्री नव्हती देतायेत. परंतु त्याच्या शौर्याबद्दल चा असलेला विश्वास महाराजांनी दाखवून दिला. आणि जेव्हा एखादा नेता आपल्याबद्दल एवढा विश्वास दाखवतो म्हटल्यानंतर प्रजा किती जोडली जात असेल याची कल्पना आपल्याला येईलच.
अशा या महान राजा शिवछत्रपतींची उद्या जयंती ! त्यांचे स्मरण करून, त्यांना नमन करताना यांच्यातील काही गुणवैशिष्ट्ये उचलता आलीत तर खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी केली असं होईल.
मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला