किल्ला ‘लोहगड’

lohagad killa

‘लोहगड’ किल्ला नावाप्रमाणेच लोहासारखा मजबूत, बुलंद आणि अजिंक्य आहे. किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत ताठ मानेने उभी आहे. लोहगड किल्ल्याचा इतिहास अंदाजे २५०० वर्ष जुना आहे. किल्ल्याजवळ भाजे आणि बेडसे लेणी आहेत. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांनी लोहगडावर साम्राज्य गाजविले आहे.

सन १६५७ मध्ये छत्रपतींनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६६५ साली हा किल्ला पुरंदरच्या तहान्वये मोघलांना मिळाला. सन १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. सन ४ मार्च १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकला. गडावर चढतांना चार प्रवेशद्वारांमधून गणेश दरवाजा,नारायण दरवाजा,हनुमान दरवाजा आणि महादरवाजातून सर्पाकार मार्गावरून वर जावे लागते, त्यामुळे किल्ल्यावरच्या पहारेकऱ्यांस बाहेरून गडावर येणार्‍या माणसावर नजर ठेवता येणे सोयीचे जाई.

महा दरवाज्यातून जवळच एक दर्गा लागतो, दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्र अवशेष आढळतात. दर्ग्याच्या जवळ बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे तर उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. दर्ग्याच्या पुढे थोड्या अंतरावर शिवमंदिर आहे, शिवमंदिरा जवळ पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. मंदिराच्या थोडे पुढे सोळाकोनी तळं आहे, नाना फडणवीसांनी हे तळ बांधलं आहे. तळ्याच्या पुढे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. तिला विंचूकाटा म्हणतात. तळं आणि विंचूकाट्याच्या दरम्यान आपणांस भग्नावस्थेतील वाड्याचे अवशेष आढळतात.

पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणाऱ्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे ओलांडून भाजे गावातून थेट लोहगडला यावे. अंदाजे दीड तासांच्या प्रवासानंतर ‘गायमुख खिंड’ लागते. खिंडीच्या अलिकडेच लोहगडवाडी आहे. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास जाता येते आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर जाता येते. गडावरील लक्ष्मी कोठीत रहाण्याची सोय होऊ शकते तेथे अंदाजे ३० ते ४० जण आरामात राहू शकतात. जेवणाची सोय आपण स्वतः करावी अथवा लोहगडवाडी जेवणाची सोय होते. शिवाय गडावर बारमाही पिण्यासाठी पाणीही उपलब्ध आहे.