धनंजयच्या हॅट्ट्रिकला पोलार्डचे षटकारांच्या डबल हॅट्ट्रिकने चोख उत्तर

Kieron Pollard and Akila Dhananjay

“लागोपाठ तीन षटकार लगावल्यावर मला वाटायला लागले होते की, आपण सलग सहा षटकार लगावू शकतो. सुपर फिफ्टीमध्ये मी ते केलेले आहे म्हणून मला विश्वास होता. एकदा का पाच षटकार लगावले की गोलंदाज दडपणात येईल हे मला माहित होते. तो अराउंड द विकेट आला आणि ते त्याच्यासाठी सहज नव्हते. तेंव्हा मी स्वतःला म्हणालो, हीच संधी आहे, सोडू नकोस,” या भावना आहेत वेस्ट इंडिजचा (West Indies) तडाखेबंद फलंदाज किरोन पोलाॕर्डच्या (Kieron Pollard). टी-20 सामन्यात गुरुवारी अँटिग्वा (Antigua) येथे श्रीलंकेच्या लेगस्पिनर अकिला धनंजयला (Akila Dhananjay) लागोपाठ सहा षटकार लगावल्यानंतर तो बोलत होता.

गंमत म्हणजे याच्या आदल्याच षटकांत अकिला धनंजयने हॅट्ट्रिक केली होती. त्याने एविन लुईस, ख्रिस गेल व निकोलस पूरन यांना लागोपाठच्या चेडूवर बाद केले. कदाचित त्याचीच खून्नस पोलार्डने पुढल्याच षटकात काढली. त्याने डावातील सहाव्या षटकाचा पहिला चेंडू लाँग आॕनला स्लॉग केला. दुसरा चेंडू त्याने सरळ साईड स्क्रीनवर भिरकावला. पुढचा चेंडू लाँग आॕफला स्मॕश करत षटकारांची हॅट्ट्रिक साजरी केली पण एवढ्यावरच पोलार्ड थांबला नाही तर चौथा चेंडूसुध्दा डीप मीडविकेटला सीमापार झाला.पाचवा चेंडू पुन्हा सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरुन त्याने सीमापार केला आणि डीप मिडविकेटला भिरकावलेल्या चेंडूसह त्याने अकिला धनंजयच्या हॅट्ट्रिकला षटकारांच्या डबल हॅट्ट्रिकने उत्तर दिले. आणि काॕमेंट्री करताना समालोचक इयान बिशप म्हणाला किरोन पोलार्डचे सहा षटकार! हर्षल गिब्ज, युवराज सिंग…तुम्हाला कंपनी मिळालीय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा चेंडूवर सहा षटकार लगावणारे हे तिघेच आहेत. 2007 मध्ये वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्जने नेदरलँडच्या दान व्हॕन बुंज, युवराजसिंगने त्याच वर्षी टी-20 सामन्यात स्ट्युअर्ट ब्रॉडला आणि आता किरोन पोलाॕर्डने अकिला धनंजयला आंतरराष्ट्रीय सामन्यात सहा षटकार लगावले आहेत.

टी-20 सामन्यांमध्ये युवराज व पोलार्डशिवाय एका षटकात सहा षटकार लगावणारे आणखी तीन फलंदाज आहेत. ती यादी बघूया..
युवराज सिंग – स्ट्युअर्ट ब्रॉड – 2007
रॉस व्हाईटेली – कार्ल कार्व्हर – 2017
हझरतुल्ला झझाई – अब्दुल्ला मझारी – 2018
लिओ कार्टर – अंतोन देवसीच – 2020
किरोन पोलाॕर्ड – अकिला धनंजय – 2021

आणि एकूणच एका षटकात सहा षटकार लावणारांची यादी काढली तर आणखी तीन नावांची भर पडते…ते म्हणजे
गॕरी सोबर्स – काउंटी सामना – 1968
रवी शास्री – रणजी सामना – 1985
हर्शल गिब्ज – वन डे सामना- 2007

या प्रकारे एका षटकात सहा षटकार लगावणारे आठ फलंदाज असले तरी एकाच सामन्यात विकेटसची हॅट्ट्रिक आणि त्यानंतर षटकारांची डबल हॕट्ट्रिक सोसणारा अकिला धनंजय हा एकमेव गोलंदाज ठरला आहे. धनंजयचे हाल येथेच संपले नाहीत तर पोलार्डनै सहा षटकार लगावल्यावर त्याच्या पूढच्य षटकातील पहिल्या चेंडूवरसुध्दा जेसन होल्डरने षटकार लगावला. याप्रकारे धनंजयला सलग सात चेंडूवर सात षटकार लागले. शिवाय त्याच्या गोलंदाजीवर दोन झेलसुध्दा सुटले.

धनंजयने डावातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एव्हिन लुईसला गुणतिलककडे झेल देण्यास भाग पाडले. चेंडू एक्स्ट्रा कव्हरवरुन मारण्याच्या प्रयत्नात मिसटाईम झालेला त्याचा फटका गुणतिलकने लाँग आॕफहून धावत येत झेलला. ख्रिस गेलला आल्याआल्या त्याने पायचीत केले.रिव्ह्युवर त्याला ही विकेट मिळाली. गेलला हा चेंडू लेगसाईडकडे काढायचा होता पण वळलेल्या चेंडूने त्याच्या बॕटीला हुलकावणी दिली आणि त्याच्या मागच्या पायावर चेंडू आदळला. बऱ्याच दिवसांनी पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या युनिव्हर्स बाॕसचे असे अपयशी पुनरागमन झाले. हॕट्ट्रिक टाळण्याची जबाबदारी निकोलस पूरनची होती पण आॕफच्या बाहेरचा चेंडू आणखी बाहेर वळून पूरनच्या बॕटीची बाहेरची कड घेऊन यष्टीरक्षक डिकवालाच्या हातात विसावला आणि अकिला धनंजयची हॅट्ट्रिक पूर्ण झाली पण त्याचा हा आनंद पोलार्डने फार काळ टिकू दिला नाही.

धनंजय हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॕट्ट्रिक करणारा जगातील 15 वा आणि श्रीलंकेचा चौथा गोलंदाज ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER