किरोन पोलार्ड ठरतोय मुंबईसाठी लकी अँम्बेसेडर

Kieron Pollard

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ आणि त्यांचा पार्ट टाईम कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) हे दोघे फॉर्मात आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत पोलार्ड यशस्वी कर्णधार सिद्ध होत आहे आणि मुंबईचा संघ पहिल्या स्थानी आहे. ते सलग नवव्यांदा प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत आणि पोलार्डचे त्यात विशेष योगदान आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ एकदाही पोलार्डशिवाय प्ले ऑफला पात्र ठरलेला नाही. ज्या नऊ वेळा ते आयपीएल प्ले ऑफचे सामने खेळले त्या प्रत्येक वेळी पोलार्ड त्यांच्या संघात होता.

पोलार्डने २०१० मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले आणि सुरुवातीपासून तो केवळ मुंबई इंडियन्ससाठीच खेळत आला आहे. त्याच्या पदार्पणाच्या मोसमातच मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदा आयपीएल प्ले ऑफसाठी पात्र ठरला होता. २०१० नंतर २०११, १२, १३, १४, १५, १७, १९ आणि आता २०२० मध्येही ते प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत आणि या प्रत्येक वेळी पोलार्ड त्यांच्या संघात आहे. मुंबईच्या संघातील तो असा एकमेव खेळाडू आहे.पोलार्डने आतापर्यंत आयपीएलमध्ये १६१ सामन्यांत १५० च्या स्ट्राईक रेटने २९७३ धावा केल्या आहेत आणि ३२.३८ च्या सरासरीने ५९ विकेट घेतल्या आहेत.

२००९ मध्ये चॅम्पियन्स लीग व बिग बॕश लीगमधील त्याची कामगिरी बघून मुंबईने त्याला २०१० मध्ये आपल्या संघात घेतले होते. त्या मोसमातील तो सर्वांत महागडा खेळाडू होता. पहिल्याच मोसमात सेमी फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध त्याने १३ चेंडूंत ३३ धावा केल्या आणि तीन बळीसुद्धा मिळवले होते. त्या विजयात तो सामनावीर ठरला होता.

२०१३ च्या अंतिम सामन्यात त्याने मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यावेळी त्याने ३२ चेंडूंतच ६० धावा करताना मुंबईला ४ बाद ५२ या स्थितीतून सावरले होते. २०१५ च्या अंतिम सामन्यातही त्याने १८ चेंडूंतच ३६ धावा फटकावल्या होत्या. त्या मोसमात त्याने ४१९ धावा केल्या होत्या. यंदा त्याने १३ सामन्यांत २०० च्या स्ट्राईक रेटने २१८ धावा केल्या आहेत आणि तीन बळी मिळवले आहेत. शिवाय रोहितच्या अनुपस्थितीत तो मुंबई इंडियन्सचे यशस्वी नेतृत्व करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER