दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण;मुलाची सुटका,अपहरणकर्ते पसार

Child-kidnapping

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातल्या वडाची वाडी येथे घराच्या आवारात खेळणाऱ्या दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन दहा लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार घडला. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या अकरा तासांमध्येच मुलाची सुटका करण्यात आली. अपहरणकर्त्यांना जेरबंद करण्यात मात्र पोलिसांना यश आले नाही.

पुष्कराज धनवडे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. पुष्कराजचे वडील सोमनाथ धनवडे हे व्यावसायिक असून त्यांचा वडाची वाडी येथे बंगला आहे. शनिवारी (ता. 23) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुष्कराज बंगल्याच्या आवारात खेळत होता. त्यानंतर अचानक तो गायब झाला. काही वेळाने सोमनाथ धनवडे यांना आलेल्या फोनवर अपहरणकर्त्यांनी मुलाला सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागितली़. धनवडे यांनी या प्रकाराची माहिती तातडीने पोलिसांना दिली.

ही बातमी पण वाचा : पाकिस्तानमध्ये दोन हिंदू मुलींचे अपहरण करून धर्मांतर

दोन वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी घरातून अपहरण केल्याचे कळताच कोंढवा पोलीस आणि गुन्हे शाखेची विविध पथकांनी तपास चालू केला. पैसे घेऊन नाशिकला येण्याची सूचना अपहरणकर्त्यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांचे एक पथक नाशिक मार्गाला रवाना झाले. धनावडे यांच्या घराशेजारच्या परिसरात दुसऱ्या पथकाने तपास चालू केला. धनावडे यांना आलेला फोन आणि त्याच्या तांत्रिक विश्लेषणातून अपहरणकर्ते उंड्री परिसरात असल्याचे उघडकीस आले. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी अशी सुमारे ८० जणांची टीम रात्रीच उंड्रीमध्ये दाखल झाली. या सर्वांनी उंड्री परिसरात कसून शोध चालू केला. कोंढवा पोलीस या शोध मोहिमेत सहभागी होते़. स्थानिक ग्रामस्थ पोलिसांना मदत करत होते.

रविवारी (ता. 24) सकाळी साडेसहाच्या सुमारास हांडेवाडी परिसरात ग्रामस्थांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली़. या परिसरात तीन पडीक बंगले आहेत. त्या ठिकाणी पोलिस आणि ग्रामस्थांनी शोध चालू केला. त्याचवेळी एक अनोळखी इसम एका मुलाला घेऊन पळून चालल्याचे दिसले. सर्वांनी त्याचा पाठलाग सुरु केल्यानंतर त्या इसमाने मुलाला शेतात टाकून दिले आणि स्वतः पळ काढला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याला पालकांच्या स्वाधीन केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम राबवून पुष्कराजची सुटका केली. या बद्दल पोलिसांचे कौतूक होत आहे. दरम्यान अपहरणकर्त्याचा शोध चालू आहे.