शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी घुसले; काँग्रेसचे खासदार रवनीत बिट्टू यांचा दावा

Ravneet Bittu

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सुरू असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत, असा दावा काँग्रेसचे लुधियानामधील खासदार रवनीत बिट्टू यांनी केला. ज्यांची आंदोलने अपयशी ठरली आहेत ते आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊ पाहत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या मुलींना शिवीगाळ केली जाते. हे कसले पंजाब आहे? पंजाबमधील लोक असे करू शकत नाहीत. पंजाबमधील शेतकरी असे करू शकत नाहीत. ‘ठोक देंगे’ ही पंजाबची भाषा नाही आहे. अशी भाषा वापरणारे असामाजिक तत्व आहेत.

पंतप्रधानांना मारू किंवा अन्य कुणाला मारू, अशी भाषा शेतकरी करू शकत नाहीत. मी या आंदोलनामध्ये हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या लोकांना फिरताना पाहिले आहे. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे.

रवनीत सिंह बिट्टू म्हणालेत, शेतकरी शांततेने आंदोलनाला बसले आहेत. तीन महिने पंजाबमध्ये आंदोलन सुरू असताना काही झाले नाही. पंजाब सरकारने हे आंदोलन शांततेने व्हावे यासाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीसह पाच ते पन्नास हजार जण आहेत. हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. आता नेत्यांनी पुढे येऊन यावर नियंत्रण मिळवले पाहिजे कारण अनेक जण हे आंदोलन अपयशी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

हे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहच हे आंदोलन थांबवू शकतात. शेतकऱ्यांनाही तसेच वाटते. शेतकऱ्यांचा ना कृषिमंत्र्यांवर विश्वास आहे. ना अन्य कुणावर, असे बिट्टू म्हणालेत. रवनीत सिंह बिट्टू हे काँग्रेसचे तरुण नेते आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लुधियाना येथून निवडून आले आहेत. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. मुख्यमंत्री असताना बेअंत सिंह यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER