पवारांच्या भेटीनंतर खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश नक्की?

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीअज्ञातस्थळी चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. पवार-खडसे भेटीनंतर एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी स्वपक्षावर उघड नाराजी व्यक्त केली होती.

शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पवार-खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. पवारांच्या भेटीनंतर खडसे देहरादूनला रवाना झाले.

विशेष म्हणजे जळगावातील मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचं चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले फलक काढण्यात आल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली आहे. पंकजा भाजपमध्येच राहणार, पण माझा भरोसा धरु नका, असे उघड संकेत एकनाथ खडसेंनी गेल्या आठवड्यात गोपीनाथगडावरुन दिले होते.