खडसेंचे मोठे विधान; म्हणाले, भाजपचे अनेक आमदार अस्वस्थ असल्याचे लवकरच दिसून येईल

Devendra Fadavis-EknathKhadse

मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी एकनाथ खडसे मुंबईला असल्याने दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी दिली होती. फडणवीसांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले होते. मात्र ही राजकीय भेट नसल्याचे म्हणत एकनाथ खडसेंनी चर्चेला पूर्णविराम दिला होता. आता मात्र एकनाथ खडसे यांनी मोठे विधान करुन भाजपची चिंता वाढवली आहे. भाजपचे अनेक आमदार अस्वस्थ असून, ते लवकरच पक्ष सोडणार असल्याचे एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी म्हटले आहे.

आज टीव्ही-९ मराठीशी बोलताना खडसे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यासह भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीचे सरकार लवकरच कोसळण्याचा दावा करत आहेत. मात्र हा त्यांचा भ्रम असून, महाविकास आघाडी भक्कम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडीचे सरकार उत्तम काम करत आहेत. ठाकरे सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नसल्याने भाजपचे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. विशेषकरुन सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस खूपच अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील आणि इतर नेते माध्यमांना सांगत आहेत. सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही देऊन टाकल्या. फडणवीसांनी तारीखही निश्चित केली होती. पण काहीही होणार नसून, हे सरकार पडणार नाही. विरोधक वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी लगावला. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसेंदिवस अधिकच मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत. मात्र लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. अनेक आमदार पक्षांतर करणार आहेत, असा दावाही त्यांनी केला.

अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यावरूनही खडसेंनी त्यांच्यावर टीका केली. फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनीदेखील फडणवीसांच्या या भेटीवर प्रतिक्रिया दिली. मी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे. जेवणही माझ्याकडेच करायचे. मुक्कामही करायचे. फडणवीस त्यावेळी माझ्या बी-४ बंगल्यावर बऱ्याचदा यायचे. मुख्यमंत्री म्हणूनही ते माझ्याकडे जळगाववला मुक्ताईनगरला आले होते. माझ्याकडे सूत गिरणीचं, साखर कारखान्याचं उद्घाटन झालं तेव्हा ते येऊन गेले होते, असेही खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button