खडसे भाजप सोडणार!

Eknath Khade & Devendrav Fadnavis

भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर दोन दिवसांपासून जोरदार टीका चालविली आहे. आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानेच आपल्याला पद्धतशीरपणे बाहेर करण्यात आले. ज्यांना आपण मोठे केले त्यांनीच आपल्याला बाहेर काढले, आपल्यावरील आरोपांमध्ये काहीच दम नव्हता पण आपल्याला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आले अशी आरोपांची झडी त्यांनी लावली आहे. खडसे यांचा ताजा पवित्रा बघता ते भाजपमध्ये फार दिवस राहणार नाहीत असे दिसते. फडणवीस यांच्याबद्दलची कमालीची खदखद खडसे यांच्या मनात आहे हे स्पष्टच दिसते आणि त्या अस्वस्थतेचा लवकरच स्फोट होऊ शकतो. सर्वच पक्षांकून आपल्याला आॅफर आहे असे खडसे यांनी मध्यंतर म्हटले होते.

भाजपमध्ये पक्षातील नेत्यांविरुद्ध असे जाहीरपणे बोलण्याची पद्धत नाही. ज्यांनी ज्यांनी अशी भाषा केली त्यांना पक्षाने आजवर जागा दाखवून दिली आहे. काँग्रेसमध्ये आपल्याच नेत्यांच्या विरोधात आरोप करणे चालते, तेथे अतिलोकशाही आहे, भाजपमध्ये मात्र ते सहन केले जात नाही. हा पूर्वानुभव लक्षात घेता खडसेंवरील आरोपांची भाजपचे दिल्लीतील नेतृत्व गंभीर दखल घेण्याची शक्यता नाही. त्याऐवजी खडसेंनीच स्वत:हून कुठलातरी निर्णय घ्यावा याची पक्षनेतृत्व वाट पाहील किंवा ते अतिच बोलत राहिले तर पक्ष त्यांची हकालपट्टीही करू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपच्या रावेरमधील खासदार आहेत. उद्या खडसेंनी भाजप सोडला तर त्याही भाजपमधून बाहेर पडतील का या बाबत उत्सुकता असेल. जाणकारांच्या मते नाथाभाऊंनी कोणताही निर्णय घेतला तरी रक्षाताई भाजप सोडणार नाहीत. भाजपमध्येच राहून दीर्घकालिन राजकारण करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांच्या नजीकचे लोक सांगतात.

खडसे काय करतील, कोणत्या पक्षात जातील? जाणकारांच्या मते ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. राष्ट्रवादीकडून त्यांना विधान परिषदेवर पाठविले जाऊ शकते. तसे झाले तर राष्ट्रवादीला जळगाव जिल्ह्यापुरता काही प्रमाणात फायदा होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे बाकी आहेत आणि एवढ्या काळात खडसे ज्या लेवा पाटील समाजाचे आहेत त्या समाजाचे पर्यायी नेतृत्व भाजपकडून जळगाव जिल्ह्यात तयार केले जाईल वा आहेत त्या लेवा पाटील समाजाच्या नेत्यांना ताकद दिली जाईल, असे म्हटले जाते.

खडसे यांचा जळगाव जिल्ह्यावर एकछत्री अंमल पूर्वी होता. आज तो राहिलेला नाही. फडणवीस सरकारच्या काळात मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे नेते मानले जात. त्यातच नाथाभाऊंचे कट्टर समर्थक मानले जाणारे आमदारही मनाने त्यांच्यासोबत राहिले नसल्याचे चित्र होते. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा अपवाद होता. सावकारे हे पूर्वीचे राष्ट्रवादीचेच आहेत. ते उद्या राष्ट्रवादीत गेले तर आणि रक्षा खडसे भाजपमध्येच राहिल्या तर खडसे कुटुंबातच दोन पक्ष दिसतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER