‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’, पवारांचे कौतुक करत खडसेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis - Sharad Pawar - Eknath Khadse

जळगाव : भाजपचे (BJP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्यापासून सातत्याने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हणत आजही त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे गुणगान गाऊन फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. एकनाथ खडसेनंतर आता त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. आज मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावात त्यांच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी समर्थकांना मार्गदर्शन करत खडसेंनी भाजपवर निशाणा साधला. मी स्पर्धक असल्याने माझ्या विरोधात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. माझा मोठा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनयभंग सारखा गुन्हा दाखल करण्याचं नीच राजकारण करण्यात आलं. ज्या पक्षाला मी लहानाचं मोठं केलं तो पक्ष सोडावा वाटत नव्हता. मात्र आपलेच गद्दार झाले त्यामुळे कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा असं वाटलं. मी पक्ष सोडला नाही, मला पक्ष सोडायला भाग पाडले, असं म्हणत त्यांनी पवारांचे गुणगान गाऊन फडणवीसांवर निशाणा साधला.

खडसे म्हणाले की, मला पक्षाने भरपूर दिलं अस सांगितलं जातं. मात्र मीही माझ्या आयुष्याची चाळीस वर्षे पक्षासाठी घालवली. मुलगा गेल्यानंतरही पक्षासाठी भक्कमपणे उभा राहिलो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. माझी छळवणूक सुरूच राहिल्याने मी पक्ष सोडला, काय चूक केली. अन्याय होत असताना पक्षात कायम असल्याने कार्यकर्ते पक्ष सोडण्यासाठी दबाव आणत होते. म्हणून निर्णय घ्यावा लागला.

पक्षाने एका व्यक्तीचे लाड पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रच वाटोळं केलं. मिळणार असलेली सत्ताही गमावली. ही व्यक्ती कोण हे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मला तिकीट मिळणार नाही हे भाजपचे राष्ट्रीय समन्वय असलेले डॉ. राजेंद्र फडके हे माझ्या व्याह्यांना आधीपासून सांगत होते. मला तिकीट मिळणार नाही यांना कसं अगोदरपासून माहित होतं. अगोदर कट केला असेल तरच हे होऊ शकतं. आपली भाजपच्या विरोधात नाराजी नाही, फक्त एकाच व्यक्तीबाबत आहे, असं म्हणत खडसे यांनी फडणवीसांवर हल्लबोल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER