राष्ट्र्वादीतही खडसे नाराज, म्हणाले ‘ मी अजूनही घरीच बसलेलो’

Eknath Khadse

जळगाव : “राज्याच्या राजकारणात आता कुठली घडामोड सुरू आहे, हे मला माहिती नाही. कारण मी अजूनही घरीच बसलो आहे. परंतु, सुडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी कोणी असेल, तर तो मी आहे. माझ्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण केल्या गेले. अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नाराजी व्यक्त केली. एकनाथ खडसे शनिवारी सायंकाळी जळगावात आले होते. आपल्या मुक्ताई निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत शुक्रवारी (18 डिसेंबर) खुलासा करताना गिरीश महाजन यांनी आपल्यावर सुडाच्या राजकारणातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. यामागे जिल्ह्यातील एक बडा नेता असल्याचाही आरोप महाजन यांनी केला. यावेळी महाजन यांनी एकनाथ खडसे यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांच्याकडे रोख केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसेंनी आपल्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला, हे स्पष्ट केलं.

यावेळी खडसे म्हणाले की, कोणतंही कारण नसताना माझ्यावर खालच्या दर्जाचे राजकारण करत विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा मुक्ताईनगरात घडल्याचे दाखवून शून्य क्रमांकाने तो मुंबईत दाखल करण्यात आला. कुणाच्या तरी दबावाशिवाय हे घडणं शक्य होतं का? असाही सवाल एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला. गिरीश महाजन यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना खडसेंनी म्हणाले, मी काही बडा नेता नाही. विधीमंडळाचा सदस्यही नाही. मंत्रिमंडळावर माझा प्रभाव नाही. जिल्ह्यात अनेक बडे नेते आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांनी थेट नाव घ्यायला हवं होतं.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या मी घरी बसून आहे या वाक्यप्रयोगावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही एकनाथ खडसे आपण घरी बसलोय असं का म्हणत आहेत? या मागे एकनाथ खडसे यांची नाराजी आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

ही बातमी पण वाचा : भाजपच्या गोटात असलेले आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, पवारांची घेतली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER