राष्ट्रवादीच्या प्रवेशावर खडसेंनी संभ्रम वाढवला; पक्षाच्या बैठकीला न जाता ऑनलाईन हजेरी

Eknath Khadse - BJP - Sharad Pawar

मुंबई :- पक्षात योग्य मान मिळत नसल्याचा आरोप करत भाजपचे (BJP) माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे सध्या नाराज आहेत. त्यातच भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत डावलल्याने खडसेंच्या पक्षांतरणाच्या चर्चा अधिकच वाढल्या आहेत. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करतील अशा बातम्या कालपासून प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. अशातच आज दादरच्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयात भाजपच्या राज्य प्रदेश पदाधिकारी आणि प्रदेश कार्य समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रवीण दरेकर, खासदार प्रीतम मुंडे, रक्षा खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत. मात्र मुंबईत असूनही खडसे यांनी बैठकीला ऑनलाईन हजेरी लावल्याने त्यांच्या पक्षांतरणाबाबत अधिकच संभ्रम वाढला आहे.

पक्षाच्या बैठकीला इतर नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) हेसुद्धा व्हिडीओ कॉफरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीला संबोधित करणार आहेत. केंद्राने मंजूर केलेला कृषी कायदा, कामगार कायदा तसेच इतर विषयांवर या बैठकीच चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, पीयूष गोयल हेसुद्धा दिल्लीतून या बैठकीत सहभागी होणार आहेत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर, विजया रहाटकर या नवनियुक्त सदस्यांचं स्वागत केलं जाईल, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली होती;

पण भाजपच्या (BJP) अधिकृत प्रसिद्धिपत्रकात कुठेही खडसेंचा उल्लेख नव्हता. तसेच एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे खडसे नेमकी काय भूमिका घेतात, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. पण एकनाथ खडसे प्रत्यक्ष हजेरी न लावता ऑनलाईन प्रणालीद्वारे भाजपच्या कार्यकारिणीत सहभागी झाले असून, खडसे वसंत स्मृतीला जाणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. कालच त्यांनी आपण पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईत आल्याचे सांगितले होते. मात्र आज त्यांनी प्रत्यक्षात बैठकीला येणे टाळले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चेला अधिकच बळ मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER