…पण आम्ही ४० वर्षं निष्ठेनं काम करूनही डावललं जातं; खडसे खवळले

Eknath Khadse

जळगाव : मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ म्हणणारे, पंतप्रधानांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. पण आम्ही ४० वर्षं  निष्ठेनं काम करूनही आम्हाला डावललं जातं- अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खदखद बोलून दाखवली आहे. तसेच भाजपा कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.

गोपीचंद पडळकर, हे वंचित बहुजन समाज पार्टीतून विधानसभेपूर्वी भाजपात आलेत. त्यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपाच्या  वरिष्ठ जुन्या  नेत्यांची जी नावे चर्चेत होती त्या सर्वांनाच पक्षाने डावलले आहे. येत्या २१ मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे चर्चेत होती.

मात्र, शेवटच्या क्षणी चौघांचाही पत्ता कापून पक्षानं नव्या चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसं झालं असतं तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणाऱ्यांना इथं संधी दिली गेली आहे.’ असे म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. पडळकर वंचितमध्ये असताना मोदी गो बॅकचा नारा दिला होता.

तसेच मोदींच्या सभेवर बहिष्कारदेखील टाकला होता. त्यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीत अनेक वर्षे असलेल्या मोहिते-पाटलांना संधी मिळाली आहे; मात्र, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणा-यांना डावलले आहे, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. ते टीव्ही-९ मराठीशी बोलत होते.