केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीच्या दरात धान्य

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

Orange Ration card - CM Uddhav Thackeray Meeting

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रतिव्यक्ती देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना आठ रुपये प्रतिकिलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंतीदेखील केली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या ३ कोटी ८ लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल. त्यासाठी सुमारे २५० कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यांसाठी हे धान्य दिले जाईल.

सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळते त्याव्यतिरिक्त १ लाख ५४ हजार २२० मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे त्याला अनुसरूनच सवलतीच्या दरात धान्य मिळावे, अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.