केरळच्या उच्च शिक्षणमंत्र्यांवर भावासाठी वशिलेबाजीचा ठपका

K. T. Jaleel
  • लोकायुक्तांच्या निकालानंतर राजीनाम्याची नामुष्की

थिरुवनंतपुरम : केरळचे उच्च शिक्षण आणि अल्पसंख्य कल्याण मंत्री के. टी. जलील (K. T. Jaleel) यांनी आपल्या चुलतभावाच्या सरकारी महामंडळातील नेमणुकीसाठी वशिलेबाजी आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका राज्याच्या लोकायुक्तांनी ठेवला. जलील यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेशही दिला आहे.

या कृतीने जलील यांनी मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला असल्याने ते मंत्रिपदावर कायम नाहीत, असा निष्कर्षही लोकायुक्तांनी नोंदविला आहे. केरळ लोकायुक्त कायद्यानुसार लोकायुक्त जेव्हा असा निष्कर्ष नोंदवितात तेव्हा संबंधित मंत्र्याकडून राजीनामा घेणे मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक असते.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हरुन उल रशिद यांचा समावेश असलेल्या लोकायुक्तांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. मंत्री जलील यांनी त्यांचे चुलतबंधू के. टी. अदीब यांची केरळ राज्य अल्पसंख्य विकास व वित्त महामंडळात महाव्यवस्थापक पदावर केलेल्या नियुक्तीच्या प्रकरणात हा निकाल दिला गेला.

महामंडळातील या पदासाठी मुळात व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदविका एवढीच शैक्षणिक पात्रता होती. जलील यांनी अल्पसंख्य कल्याण मंत्री या नात्याने, महामंडळाकडून तसा कोणताही प्रस्ताव नसताना ही पात्रता बी.टेक.सह व्यवस्थापनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी अशी केली. कारण त्यांचे बंधू बी.टेक. होते. पात्रतेत असा बदल केल्यानंतर जलील यांच्या भावाने महाव्यवस्थापकपदासाठी अर्ज केला. पण ते मुलाखतीसाठी आले नाहीत. त्यावेळी अन्य कोणाही अर्जदाराची निवड केली गेली नाही. त्यानंतर दोन वर्षांनी महामंडळाने महाव्यवस्थापक पदासाठी कोणतीही जाहिरात दिलेली नसूनही जलील यांच्या भावाने त्या पदासाठी अर्ज सादर केला व जलील यांनी त्याला त्या पदावर नेमण्याचा आदेश दिला.

लोकायुक्तांनी म्हटले की, यावरून जलील यांनी आपल्या जवळच्या नातेवाइकाच्या लाभासाठी वशिलेबाजी व पदाचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट होते; शिवाय मंत्री या नात्याने कोणाबद्दल आकस न ठेवता किंवा कोणालाही झुकते माप न देता काम करण्याची जी शपथ जलील यांनी घेतली होती तिचाही त्यांनी भंग केला आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button