केरळ : भाजीपाल्याला हमीभाव देणारे देशातले पहिले राज्य

Vegetabel

तिरुअनंतपुरम :- केरळ सरकारने १६ भाजीपाला उत्पादनांना हमी रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. ही किंमत उत्पादन खर्चाच्या २० टक्के जास्त असेल. भाजीपाल्याला हमीभाव देणारे केरळ हे देशातले पहिलेच राज्य आहे.

मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी ही योजना ऑनलाईन जाहीर केली. १ नोव्हेंबर २०२० पासूनच ती लागू होणार आहे. भाजीपाल्याच्या १६  उत्पादनांची यादीही सरकारने प्रसिद्ध केली आहे. भाजीपाल्याचा बाजारभाव हमी रकमेपेक्षा खाली गेला तर शेतकऱ्यांकडून शेतमाल वरील सूत्रानुसारच्या किमतीनुसारच खरेदी केला जाईल. भाजीपाल्याचे गुणवत्तेनुसार वर्गीकरण करून त्याची किंमत निश्‍चित केली जाईल, असे विजयन म्हणाले.

ते म्हणाले की, सध्या देशभरातील शेतकरी समाधानी नाही. गेल्या साडेचार वर्षांपासून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. राज्यातील कृषी विकासासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

या नव्या योजनेनुसार, पहिल्या टप्प्यात १६ भाजीपाल्यांचा समावेश केला जाईल. या किमान आधारभूत किमतीत वेळोवेळी सुधारणा केली जाईल. या योजनेत स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ते भाजीपाला खरेदी व वितरणात समन्वय ठेवणार आहेत.

या योजनेचा लाभ प्रत्येक हंगामात जास्तीत जास्त १५ एकर भाजीपाला लागवडीच्या शेतकऱ्याला देण्यात येईल. यासाठी शेतकरी १ नोव्हेंबरपासून कृषी विभागांच्या नोंदणी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

या योजनेत कोल्ड स्टोरेज सुविधा आणि उत्पादनांच्या वाहतुकीसाठी ‘रेफ्रिजरेटेड’ वाहने यासारख्या संपूर्ण पुरवठा साखळी प्रक्रिया सुरू करण्याबाबत विचार करण्यात आला आहे. केरळमधील भाजीपाला उत्पादन गेल्या साडेचार वर्षांत दुप्पट झाले असून सात लाख टनांवरून ते १४.७२ लाख टनांपर्यंत वाढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER