क्रिकेटच्या मैदानावर आलाय पुन्हा अझहर..!

Mohammed Azharuddin

मोहम्मद अझहरूद्दीन… (Mohammed Azharuddin) हे नाव वाचताच आठवतो तो उंचपुरा शैलीदार फलंदाज! त्याची ती विशिष्ट शैलीतील उंचावलेली कॉलर, त्याचा तो ट्रेडमार्क फ्लिक (Flick) शॉट आणि धोनीच्या आधी खेळलेला हेलिकॉप्टर शाॕक, जोडीला चपळ क्षेत्ररक्षण…पण कालच एक बातमी वाचण्यात आली..मोहम्मद अझहरूद्दीनने म्हणे केवळ 54 चेंडूतच नाबाद 137 धावा केल्या, त्यातले शतक तर अवघ्या 37 चेंडूतच फळ्यावर लावले. ही बातमी वाचली आणि सर्वच चक्रावले. अझहरुद्दीनने कधी निवृत्ती मागे घेतली आणि 57 वर्षे वयात तो एवढा तडाखेबंद खेळ कसा करतोय..? कमालच आहे…

नंतर हे स्पष्ट झाले की हा मोहम्मद अझहरूद्दीन म्हणजे तो नाही ज्याचा आपण विचार करतोय. हा आहे सळसळत्या रक्ताचा तरुण केरळी (Kerala) फलंदाज ज्याने काल सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बलाढ्य मुंबईच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या आणि 54 चेंडूत 9 चौकार व 11 षटकारांसह 137 धावांची वादळी खेळी करुन तो नाबाद परतला. यातले शतक तर अवघ्या 37 चेंडूतच त्याने 8 चौकार व 8 षटकारांसह फळ्यावर लावले. या वादळी खेळीचा परिणाम हा की 197 धावांचे टारगेट असूनही केरळने 31 चेंडू शिल्लक असतानाच फक्त दोन गडी गमावून सामना जिंकला.

गमतीचा भाग म्हणजे विजय साजरा झाला त्यावेळी त्याचा नाबाद साथीदार होता सचिन बेबी (Sachin Baby). एक अझहर आणि दुसरा सचिन! सांगायची गरज नाही की, या दोघांचे कुटुंब या दिग्गज क्रिकेटपटूंचे जबरदस्त फॕन असतील. तेच झालेले म्हणून मोहम्मद अझहरूद्दीनची दुसरी आवृत्ती आपल्याला बघायला मिळतेय आणि सचिनही खेळतोय. लोकं गमतीने म्हणाले की नशिब मुंबईच्या सिनीयर संघात स्थान मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरने सचिनला गोलंदाजी केली नाही.

आता 37 चेंडूत शतक आणि 54 चेंडूत 137 धावा, त्यात 9 चौकार व 11 षटकार लगावल्यावर विक्रम होणार नाहित असे होईल का? झालेच…विक्रम झाले! टी-20 सामन्यात विजयासाठी ही भारतातील सर्वोच्च खेळी ठरली आणि परदेशातही 2014 मध्ये ससेक्ससाठी नाबाद 153 धावा करणारा ल्युक राईट हाच एकटा त्याच्या पुढे आहे. आणि 16 षटकांमध्ये संपलेल्या सामन्यात तर या नव्या अझहरच्या पुढे कुणीच नाही. एवढेच नाही तर केरळसाठी टी-20 क्रिकेटमध्ये त्याने शतकांचेही खाते खोलले आणि त्याचे 37 चेंडूतील शतक हे फक्त रिषभ पंतच्या 2018 मधील 32 चेंडूतील शतकालाच संथ आहे, अर्थात सैयद मुश्ताक अली ट्राॕफी स्पर्धेत.

सिनीयर अझहरनेही आठवत असेल तर 62 चेंडूतच वन डे शतक झळकावले होते आणि त्यावेळचा तो विश्वविक्रम होता. आता ज्युनीयर अझहरने 37 चेंडूतच तीन आकडी धावा गाठल्या. येणारी पिढी अॕडव्हान्स आहे याचे हे उत्तम उदाहरण..! त्यामुळेच सेहवागसारखा स्फोटक फलंदाजानेही वा..अझहरुद्दीन.. बेहतरीन !! असे व्टिट करत कौतुक केले आहे.

आता लोकांच्या नजरेत व कट्ट्या कट्ट्यावरील चर्चेत तर हा अझहर ज्युनियर आलाच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर सिनियर अझहरप्रमाणेच तो कधी चमकतो याचीच प्रतीक्षा आहे पण सारख्याच नावामुळे त्याला सतत तुलनेचा सामना मात्र सतत करावा लागेल हे मात्र निश्चित!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER