आमचा खेळ ऑलिम्पिकपासून लांबच बरा असे ‘केंडो’च्या खेळाडूंना का वाटते?

Kendo prefers to stay away from Olympics

कोणत्याही खेळाचे पदाधिकारी आणि खेळाडूंचे आपल्या खेळासाठीचे अल्टीमेट स्वप्न काय असते? तर आपला खेळ ऑलिम्पिकमध्ये पोहचावा.ऑलिम्पिकमध्ये त्याच्या स्पर्धा व्हाव्यात पण एका खेळाची मंडळी अशी आहेत की,त्यांना वाटते आपला खेळ ऑलिम्पिकमध्ये न गेलेलाच बरा! आपला खेळ जसा आहे तसाच ठीक कारण हा खेळ जर ऑलिम्पिक वा तत्सम बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गेला तर त्याला व्यावसायिक रुप येईल. खेळात जिंकणेच सबकुछ होऊन जाईल आणि या खेळाचा मूळ आत्माच हरवुन जाईल. या खेळाची संस्कृती भ्रष्ट होईल अशी त्यांना भीती आहे.

असा कोणता आहे हा खेळ आणि कुणाला वाटतेय अशी भीती? तर मंडळी हा खेळ आहे जपानी मार्शल आर्टचा एक प्रकार ‘केंडो’ आणि त्याबद्दलची अशी भीती वाटणारे आहेत केंडोमधील आठवी पदवी (दॕन) प्राप्त मास्टर शिंगेरू एओकी.

शिंगेरु एओकी यांचे महत्त्व यासाठी की एकतर ते ‘केंडो’ मधील सर्वोच्च पदवीधारक आहेत. या खेळात फारच थोडे लोक या पदवीपर्यंत पोहोचतात. केवळ 46 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले आणि किमान 10 वर्षे सातवे दॕन ही पदवी असणारेच आठव्या दॕनच्या स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

आणि गेल्या 40 वर्षांपासून ते मुलांना या पारंपरीक जपानी मार्शल आर्टचे धडे देताहेत. दुसरे म्हणजे टोकियो ऑलिम्पिकची मशाल वाहून नेण्याचा मान त्यांना मिळाला आहे. फुकुओका जिल्ह्यात टोकियो 2020 च्या मशालीचे ते वाहक असतील.

एओकी हे आता 70 वर्षांचे आहेत पण ते जेंव्हा 14 वर्षांचेच होते तेंव्हासुध्दा म्हणजे 1964 मध्ये त्यांनी ऑलिम्पिक मशाल दौड पाहिली होती कारण 1964 चे ऑलिम्पिकसुध्दा टोकियो येथेच झाले होते. त्यावेळच्या त्यांच्या आठवणी अजुनही जाग्या आहेत.

त्यांना आठवते की 1964 मधील मशाल दौड फुकुओका शहरातुन गेली होती त्यावेळी विद्यार्थी म्हणून त्यांनी ती पाहिली होती. एओकी सांगतात, ‘ आमच्या शिक्षकांनी सांगितले होते की या आठवणी तुमच्या मनात कायमच्या साठवून ठेवा कारण आपल्याला पुन्हा कधी ही दौड पहायला मिळणार नाही कारण जपानमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन बहुधा पुन्हा होईलच हे सांगता येत नाही.’

एओकी हे 11 वर्षांचे होते तेंव्हाच त्यांच्या आईने त्यांना हा खेळ खेळण्यास सांगितले होते. त्यानंतर ते पोलीस दलात भरती झाले. सुदैवाने जपानी पोलिसांच्या दैनंदिन प्रशिक्षणात मार्शल आर्टचा समावेश असतो त्यामुळे त्यांची आणि केंडोची संगत कायम राहिली.

आता त्यांना ऑलिम्पिक मशाल दौडीचा भाग बनण्याची संधी असली तरी एओकी यांना वाटते की केंडो ऑलिम्पिकचा भाग बनू नये. अखिल जपान केंडो फेडरेशनची तशी इच्छासुध्दा नाही. यामागचे कारण त्यांना वाटते की, केंडोचे व्यावसायिकीकरण होऊन जाईल आणि केवळ जिंकणे हेच महत्त्वाचे ठरेल. तसे झाले तर या खेळाचे आचारविचार, नियम व संस्कृती नष्ट होईल असे त्यांना वाटते. शेवटी मार्शल आर्टची संस्कृती टिकवून ठेवणे हेच तर केंडो आहे असे त्यांना वाटते.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यावेळी नवीन काय?