इकिगाई ठरविताना हेही लक्षात असू द्या!

Ikigai

वाचकहो ! काल आपण आपली इकिगाई कशी निश्चित करायची ते बघितलं आणि नक्कीच तुम्ही तुमची इकिगाई शोधायला सुरुवातही केली असणारच . जपानी लोकांच्या मते प्रत्येकात आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्याची कुवत असतेच. दुसऱ्या महायुद्धात ओकिनावा येथे हल्ला झाला होता. त्यात दोनशे निरपराध लोकांचा बळी गेला .तरीही या लोकांच्या मनात इतरांबद्दल द्वेष नाही. याचे कारण त्यांची जीवनपद्धती ! खरं तर हेत्यांच्या जगण्याचे तत्त्व अगदी सहज सोपे आहे. कमी आहार , हलका व्यायाम , इतरांना मदत करणे , परस्परांशी आपुलकीने वागणे, त्यामुळे हे लोक दीर्घायुषी दिसून येतात .आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण उद्देश शोधून काढायचा प्रयत्न केला तर आयुष्यात एकाकीपणा, निराशा, दुःख येत नाही . त्यामुळे हे लोक कधीही निवृत्त होत नाहीत !

आज आपण सर्वप्रथम आपली इकिगाई ठरवताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते बघूया!

१) वर्तमान कौशल्ये कशी निवडाल? : म्हणजे माझी आवड आणि मला काय उत्तम येतं याची निवड. एखादे काम करत असताना आपण त्यात इतके बुडतो, ते काम आपल्याला फार आवडतं आणि त्यामुळे आपल्याला काळ-वेळ याचं भान राहात नाही . मात्र यावेळी आपलं कौशल्य आणि आपले लक्ष्य यांचे प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्यावी लागते . म्हणजेच आपल्या कुवतीनुसार लक्ष्य ठरवावे लागेल. यात लक्ष्य आपल्या आपल्या कुवतीपेक्षा फार जास्त असेल तर निराशा येते आणि जर फारच छोटे ध्येय ठेवले तरी कंटाळा येतो. तेव्हा या दोघांमध्ये समतोल ठेवायला शिकायला पाहिजे. याला शास्त्रीय भाषेत FLOW म्हणतात. उदाहरणार्थ, मला खूप शिवणकाम करायला आवडतं. पण माझी एकही शिवण सफाईदार येत नाही. दहा वेळा दोरा तुटतो आणि मग मला निराशा येते. यात माझी कुशलता नाहीय.

२) बुद्धिमत्ता आणि प्रतिभा : याबाबत दोन धारणा असतात. एक म्हणजे ‘फिक्स माइंड सेट’ हा असणारे लोक हे दोन्ही गुण आनुवंशिकतेने येतात, त्यात बदल करता येत नाही असे समजणारे असतात. तर दुसरा ‘ग्रोथ माइंड सेट’ या विचारांच्या लोकांना माहिती असतं की ,मेहनत, सातत्य, सराव, भावनिक लवचीकता यांच्या आधारे बुद्धिमत्ता आणि प्रतिभा हे गुण मिळवता येतात. उदाहरणार्थ आपण एखादं वाद्य शिकतो आहे . एक-दोन वेळा प्रयत्न केला. आपल्याला जमलं नाही. तर काही लोक असा समज करून घेतात की, हा गुण आपल्यात नाही . तर काही लोक मेहनत आणि सरावातून वाद्य शिकतात .कारण त्यांचा ग्रोथ माइंड सेट असतो. इकिगाई ठरवताना याचाही विचार करावा लागतो.

३) पैसा मिळणे : बरेचदा आपल्याला एखादी गोष्टीची आवड ही आहे आणि कौशल्य पण आहे. पैसा त्या प्रमाणात मिळत नाहीये . याचा अर्थ आपलं मार्केटिंग चुकतंय. तेव्हा आपला ब्रँड बिल्ड करण्यासाठी ,आपला बायोडाटा बनवा. वेबसाईट बनवा. इंटरनशिप करा, LinkedIn ची मदत घ्या किंवा कुणी मेंटोर शोधा.

४) ज्याची दुनियेला गरज आहे : हे बघताना आपल्याला वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन विचार करावा लागेल . यामुळे निश्चित एक वेगळी ऊर्जा ,उत्साह आपल्याला मिळेल . दररोज बिछान्यातून बाहेर पडण्यासाठी जीवन लक्ष्य असेल.

हे सगळं करताना बरेचदा प्रत्यक्ष कृती करायला मन धजावत नाही. अपयश येईल का? माझा निर्णय चुकत तर नसेल? स्वतःच्या कुवतीबाबत शंका येणे, आत्मविश्वास डळमळीत होणे अशा गोष्टी होऊ शकतील; पण जपानी लोक हे जाणतात की सकारात्मकतेने आणि सातत्याने काम करत राहिल्यास यश आणि पैसा येतोच. कुठलीही गोष्ट सहजतेने घेणे, तसेच ‘फील पॉझिटिव्ह अँड टेक इट ईझी अँड सिम्पल’ ही त्यांची वृत्ती आहे.

याबरोबरच दीर्घायुष्य ,कार्यरत आणि आनंदी ठेवणाऱ्या या इकिगाईचे दहा सोपे नियम आहेत; पण ते अमलात मात्र आणायला हवेत . ते थोडक्यात बघू या.

  • सतत कार्यरत राहा : जपानी लोक कधीही निवृत्त होऊन रिकामे राहात नाहीत. सतत कुठल्या ना कुठल्या आवडीच्या कामात ते गर्क असतात आणि आनंद मिळवतात.
  • निवांत राहा आणि घाई करू नका : सध्याचे आयुष्य खरंच बरंचसं याउलट आहे. सततची धावपळ हे आजचे आपले जीवन होऊन बसले आहे .मात्र सतत काम करत असूनही हे लोक शांत आणि आनंदी असतात .’स्लो बट् स्टेडी विन्स द रेस’ हे त्यांना माहिती आहे.
  • पोट थोडे रिकामे ठेवा : तडस लागेपर्यंत न जेवता ते पोटाचा फक्त ८० टक्के भाग भरून घेतात आणि काही हिस्सा रिकामा सोडतात. भरपूर भाज्या आणि प्रथिने त्यांच्या आहारात असतात. हे स्वतः पिकवतात, स्वतः बनवतात आणि जेवतात . ग्रीन टी त्यांच्या आहारातला महत्त्वाचा भाग असतो.
  • चांगल्या मित्रांच्या सहवासात राहतात : बरेच लोक ,काही परिस्थिती ,काही ठिकाणचे वातावरण आपल्याला नकारात्मक तिकडे घेऊन जाते .फार कमी लोक कसे असू शकतात की ज्यांच्या सहवासात आपल्याला खरं सकारात्मक आणि प्रेरणादायी वाटत असतं .त्यांच्याबरोबर राहणे हे लोक पसंत करतात.
  • तंदुरुस्तीसाठी व्यायाम : स्वतःच्या फिटनेससाठी ते सतत हलका व्यायाम घेतात. त्यांच्या रुटीनचाच तो एक भाग असतो, ज्यात कधीच खंड पडत नाही.
  • हास्य/आनंदी राहणे : हास्य हे संसर्गजन्य आहे. दिवसभरात जर खळखळून हसणे होत असेल तर ते एकूणच तब्येतीला आणि आजूबाजूचे वातावरण सकारात्मक करण्यास उपयुक्त ठरते. जपानी लोक आपली प्रसन्नता टिकवून ठेवतात.
  • निसर्गाच्या सहवासात राहा : निसर्ग आपल्याला सतत फक्त देत असतो. निसर्ग सहवासात आपला वेळ घालवल्यास शांतता, आनंद ,स्वास्थ्य यांचा अनुभव येतो. जपानी लोक बराच वेळ निसर्ग सान्निध्यात घालवतात.
  •  कृतज्ञता व्यक्त करा : आपले शरीर हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. म्हणूनच आपण रोज सकाळी त्यात काहीही बिघाड न होता उठतो, हेच खरे तर कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे आहे .कळत नकळत आपल्या सभोवती आपल्याला मदत करणाऱ्या, हातभार लावणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
  • वर्तमानात जगा : हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. सगळे दुःख उद्भवतात ते भूतकाळातील नकोशा विचारांचा कचरा आणि पुढच्या काळातील चिंता यामुळे! One day at a time or one minute at a time असे जगायला सांगणारे हे तत्त्वज्ञान . त्यामुळे प्रत्येक सुंदर वर्तमान क्षण उपभोगता येतो.
  • तुमच्या इकिगाईप्रमाणे जगा : बरेच जणांना सतत दुसऱ्यांशी तुलना करायची सवय असते. पण आपण बघितलं त्याप्रमाणे प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळी असतात. त्यामुळे एकदा आपली इकिगाई ठरवली तर त्यानुसारच मार्गक्रमण करायला हवे .तीच तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे, याचा विसर पडू देऊ नये.

मित्रहो , इकिगाईतील चारही आयाम एकत्र झाले तरच ते तुम्हाला सुखावह आणि आणि परिपूर्णता मिळवून देणारे असणार आहे. म्हणूनच याचा एकत्रित विचार करायला हवा. तेव्हा तुमची इकिगाई निश्चित केली नसेल तर आज सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात घेऊन तुमचे काम कदाचित आणखीन सोपे होईल .त्याबरोबरच हे दहा नियम जर आपल्या मनावर कायम करून ठेवले, सतत त्यांची आठवण ठेवली आणि दररोजचा रूटीनमधील भाग त्यांना बनवलं तर आपले आयुष्य नक्कीच निरोगी ,स्वस्थ आणि आनंददायी होईल!

मानसी फडके
एम ए मानसशास्त्र,
एम. एस. समुपदेशन आणि सायको थेरपी
एम .ए. मराठी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER