‘मास्क’चे सुरक्षाकवच ठेवेल कोरोनापासून दूर

महिला बचत गट, बंदीजनांकडून मास्क, सुरक्षा पोशाख, बेडची निर्मिती

Mask's shield away from the corona

अमरावती :- कोरोनाने जगापुढे नवे संकट उभे केले असताना त्यावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना समाजातील विविध स्तरांतून साथ मिळत असून, सर्वदूरचे महिला बचत गट ते कारागृहातील बंदीजन यांचेही योगदान लक्षणीय ठरले आहे. या माध्यमातून दोन लाखांहून अधिक मास्क निर्मिती, विलगीकरण कक्षासाठी खाटा अशा अनेक उपयुक्त साहित्य व वस्तूंची निर्मिती होत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग मुख्यत: नाक व तोंडावाटे शरिरात प्रवेश होऊन होतो. विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून नाक व तोंडाला मास्क लावून प्रतिबंध करणे महत्त्वपूर्ण ठरते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुती कापडाचे मास्क तयार करण्यासाठी आवाहन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले होते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही विविध संस्था, गटांना आवाहन केले. त्याला जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळून लक्षावधी मास्कची निर्मिती करण्यात आली आहे.

स्थानिक प्रदेशात पिकणाऱ्या कापसापासून सुती कापड तयार करण्याचे काम कस्तुरबा महिला बचत गट समितीकडून सोलर चरख्याच्या माध्यमातून केले जाते. त्यांच्याकडून तयार मास्क दुपदरी सुती कापडाचे असून सुरक्षित आहेत. हे मास्क स्वच्छ करुन पुनर्वापर करता येतो. स्वयंस्फूर्तीनेही अनेक गट यात सहभागी झाले असून, रोजगारही उपलब्ध होत आहे.

अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांनीही समन्वय करून बंदीजनांच्या माध्यमातून मास्कनिर्मितीला गती दिली आहे. त्यानुसार बंदीजनांकडून आतापर्यंत सुमारे ७५ हजार मास्क तयार करण्यात आले आहेत. कारागृहात अनेक बंदीजन कुशल कारागीर आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या, राखी, फर्निचर, कागदी पिशव्या त्यांच्यामार्फत तयार केल्या जातात. त्यांची बाजारात विक्री केली जाते व त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे त्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले होते.

याच पार्श्वभूमीवर विलगीकरण कक्षासाठी खाटा तयार करण्याची जबाबदारीही बंदीजनांना देण्यात आली आहे. कोविड रूग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनी येथील विलगीकरण कक्ष, मोझरी येथील कोविड केअर सेंटर आदी ठिकाणी या खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुमारे दीडशे खाटांची निर्मिती अद्यापपर्यंत झाल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

महिलाभगिनींनी काळाची गरज ओळखून केवळ मास्कनिर्मितीपुरते न थांबता सुरक्षा ड्रेसही तयार केले आहेत. दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत अमरावतीतील १३ महिला बचतगटांचा समूह अमरावती महापालिकेसाठी मास्क बनविण्याचे काम करत आहे. बचतगटातील महिला स्वत:च्या घरीच मास्क तयार करण्याचे काम करतात. मास्क बनविण्यासाठी लागणारा कापड खादी ग्रामोद्योग मंडळाकडून उपलब्ध करून दिला आहे. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार व इतरांना हे मास्क पुरविण्यात येत आहेत.

जिल्हा प्रशासन, ग्रामोद्योग कार्यालयातर्फे जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी महिला बचत गटांना सोलर चरखे आदी साधनांचे वाटप वेळोवेळी केले जाते. कस्तुरबा खादी समितीच्या अंतर्गत ३०० हून अधिक महिला खादी कापडनिर्मिती व विविध कपड्यांची निर्मिती करतात. त्याचे एक युनिटही एमआयडीसी क्षेत्रात कार्यान्वित आहे. कस्तुरबा सोलर खादी महिला संस्थेअंतर्गत विविध महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले असून मास्कनिर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे, असे ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी सांगितले.

बचतगटामधील महिला सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीतील आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक विवंचनाही काही प्रमाणात दूर झाली आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केली.

Source : Mahasamvad News


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER