अंतिम सत्राच्या परीक्षांसाठी सर्व पर्याय खुले ठेवा; कुलगुरूंच्या समितीची शिफारस

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या अंतिम सत्रातील परीक्षेसाठी आॅनलाइन (Online), आॅफलाइन आणि संमिश्र असे सर्व पर्याय खुले ठेवा, अशी शिफारस कुलगुरूंच्या समितीने राज्य सरकारकडे केली.

कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव आणि प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा पद्धती ठरविण्याचा निर्णय विद्यापीठ प्राधिकरणांवर सोपविण्यात आला आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर (Suhas Pednekar) यांच्या अध्यक्षतेखालील दहा सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीने केलेल्या ११ शिफारशींचा अहवाल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला.

अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या निर्णयासाठी १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा आणि १ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान परीक्षा आयोजित करून विद्यापीठांनी निकाल लावावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या सेमिस्टरपुरते प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिले जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. प्राधिकरणामधील व्यवस्थापन परिषद, परीक्षा मंडळे, विद्यापरिषद यांनी या संदर्भातील बैठकांमध्ये परीक्षा पद्धती, वेळापत्रक, कालावधी यांचे नियोजन करून सोमवारी ७ सप्टेंबर २०२० रोजी १२ वाजता अहवाल शासनीला सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

महत्त्वाच्या शिफारशी

  • विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन परीक्षांचे नियोजन करावे. विद्यार्थी घरातून परीक्षा देतील, यासाठी प्रयत्न करावेत.
  • कमीत कमी कालावधीच्या परीक्षांचे आयोजन करता येईल.
  • वस्तुनिष्ठ प्रश्न, ओएमआर पद्धती, ओपन बुक किंवा असाइनमेंट पद्धतींचा अवलंब करता येईल.
  • दिव्यांगांना आवश्यक सुविधा विद्यापीठांनी उपलब्ध करून द्याव्या. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रकल्प अहवालांसाठी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करता येईल.
  • विशेष बाब म्हणून, विद्यार्थी एखाद्या विषयाच्या परीक्षेला बसू शकला नाही, तर त्याला पुन्हा संधी द्यावी. प्रात्यक्षिक परीक्षांसाठी स्काइप, मीटिंग अ‍ॅपचा किवा टेलिफोनिक पद्धत वापरावी.