काश्मीरमधील हिंदू पंडितांच्या विस्थापनाची कथा आहे ‘काश्मीर फाईल्स’

kashmir files

कलम 370 हटवून नरेंद्र मोदी (Narendra Modi)सरकारने काश्मीरमधील विस्थापित काश्मीरी पंडितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यात अजून सरकारला यश आले नसले तरी लवकरच काश्मीरमधून विस्थापित झालेले काश्मीरी पंडित पुन्हा त्यांच्या घरात जाऊ शकतील अशी आशा त्यांना आहे. मात्र काश्मीरी पंडितांना विस्थापित का व्हावे लागले याची अनेक कारणे सांगितली जात असली तरी त्यातील सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न प्रख्यात लेखक, दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री करणार आहे. विस्थापित काश्मीरी पंडितांच्या जीवनावर आधारित ‘काश्मीर फाईल्स’ (Kashmir Files) या नावाने त्याने एक सिनेमा तयार केला असून याचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. सिनेमात महत्वाची भूमिका करीत असलेल्या अनुपम खेरने सोशल मीडियावर सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते.

या सिनेमाचे नाव काश्मीर फाईल्स ठेवण्यामागे एक विचार असल्याचे निर्माता दिग्दर्शक विवेक रंजनने सांगितले. विवेकने सांगितले, प्रत्येक सिनेमाच्या टायलमागे काही ना काही कारण असते. माझ्या सिनेमाचे हे नाव ठेवण्यामागेही तसेच कारण आहे. माझा सिनेमा विस्थापित काश्मीरी पंडितांवर आधारित असल्याने नावात काश्मीर आहे. आणि फाईल्सबाबत म्हणायचे तर, सरकारी कार्यालयांमध्ये एखादी फाईल पाहिजे असेल तर ती मिळत नाही आणि जास्तच मागे लागले तर अधिकारी फाईल हरवल्याचे सांगतात. त्यामुळे अनेकदा सत्य लोकांसमोर येत नाही. मी जेव्हा ‘द ताश्कंद फाइल्स’ बनवण्यास सुरुवात केली होती तेव्हा रिसर्च करताना मला फाईल हरवली, सापडत नाही अशी उत्तरे अनेकदा मिळाली होती. तेव्हाच मी, ज्या फाईल्स सापडत नाही त्या आपण का उघड करू नये असा विचार केला आणि त्या फाईल्सच्या मागे लागलो. काश्मीरमधून हिंदूंना का पलायन करावे लागले याची खरी माहिती देशातील जनतेला नाही. त्यामुळेच त्या कारणाचा सविस्तर अभ्यास करून हा सिनेमा तयार केला आहे. काश्मीरमधील फाईल्स उघडल्या असल्याने मी नावात कश्मीरसोबत फाईल्स शब्द जोडला आहे. या सिनेमात त्यावेळची राजकीय स्थिती, अर्थव्यवस्था यावर या सिनेमात भाष्य करून जुन्या फाईलींवरील धूळ साफ करण्याचा प्रयत्न केला आहे. असेही विवेकने सांगितले.

विवेकने पुढे सांगितले, या सिनेमाचे शूटिंग आम्ही रियल लोकेशनवर रियल लोकांबरोबर केले आहे. सिनेमा बनवताना क्रिएटिव्ह फ्रीडमही घ्यावे लागते. नाहीतर एखाद्या चांगल्या विषयाची डॉक्यूमेंट्री बनण्याची भीती असते आणि डॉक्यूमेंट्री पाहायला लोक येत नाहीत. त्यांना थोडा मसाला असेल तर विषय लगेच समजतो. यात मी मनोरंजनाच्या माध्यमातून विस्थापित काश्मीरी पंडितांची व्यथा मांडली आहे. हा सिनेमा प्रथम थिएटरमध्ये रिलीज होईल आणि त्यानंतर ओटीटीवर दाखवला जाईल असेही विवेकने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER