
पंढरपूर : पंढरपुरात आजच्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांचा वेढा पडण्याऐवजी संचारबंदीमुळे पोलिसांचाच वेढा पडल्याचे चित्र आहे. दशमी एकादशी आणि द्वादशी असे तीन दिवस (दि. २५ ते २७) बंद केले आहे. त्यामुळे भाविकांअभावी पंढरपूर यंदा सुने-सुने आहे. कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा नीरव शांततेत साजरा झाला. शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक झाली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. परंपरा जपण्यासाठी कार्तिकी यात्रा सोहळा प्रतीकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरा झाला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. भाविकांना पंढरीत येण्यास मनाई केली आहे.
पंढरपूर चंद्रभागेत स्नानास बंदी घातली असून बंदोबस्त ठेवल्याने चंद्रभागा वाळवंटात नीरव शांतता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा झाली. मानाचे वारकरीही महापूजेत सहभागी झाले. गाभाऱ्यात ८ जणांना प्रवेश देण्यात आला. शासकीय महापूजेवेळी मंदिरात, सोळखांबी येथे २० ते २५ लोकांनाच उपस्थित होते.
प्रतिवर्षी शासकीय महापूजेचा मानकरी दर्शन रांगेतून निवडला जातो. यंदा मानाचा विणेकरी म्हणून मंदिरात सेवा बजावणाऱ्या कवडुजी नारायण भोयर (वय ६४) यांची पूजेच्या मानकर्यात चिट्टी टाकून निवड झाली. त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर (५५) यादेखील पूजेत सहभागी झाल्या. भोयर दाम्पत्य हे (रा. मु. डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील आहेत. गेल्या १० वर्षांपासून ते मंदिरात विणा वाजवून सेवा बजावत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला